

Toddler with a seed stuck in his lung gets a new lease on life
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सीताफळ खाताना ㅋ अचानक बी गिळले जाऊन अडीच वर्षाच्या चिमुकल्याच्या फुफ्फुसात जाऊन अडकली. त्यामुळे अत्यवस्थ अवस्थेत त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील ईएनटी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने 'ब्रोन्कोस्कोपी' व्दारे फुफ्फुसात अडकलेले बी काढल्याने या चिमुकल्यास नवेजीवन मिळाले.
अडीच वर्षाच्या या चिमुकल्याच्या फुफ्फुसात सीताफळाचे बी अडकल्याने त्यास र गुरुवारी घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात दाखल करण्यात आले. अत्यवस्थेमुळे या बालकास व्हेंटिलेटर लावावे लागले. प्रकृती गंभीर बनल्याने कान नाक घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांना पाचारण करण्यात आले.
दिवाळीच्या सुट्टीवर असतानाही त्यांनी तातडीने घाटी रुग्णालयात धाव घेत परिस्थितीचे गांभीर्य व चिमुकल्याची अवस्था बघून तातडीने 'ब्रोन्कोस्कोपी' व्दारे फुफ्फुसात अडकलेली बी काढली. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख देशमुख यांच्यासह संपूर्ण टीमने शस्त्रक्रियेसाठी परिश्रम घेतले. त्यांना घाटीतील बालरोग पथकप्रमुख डॉ. तृप्ती जोशी, बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. किरण, डॉ गणेश निकम, डॉ. गणेश मोहन, डॉ. ओमप्रकाश, निवासी डॉक्टर, तसेच ओटी -१ स्टाफ, कर्मचारी योगेश लाहोट यांचे सहकार्य लाभले.
दिवाळीच्या सुट्टीत धावून आले डॉक्टर
दिवाळी-पाडव्या निमित्ताने घाटीतील ईएनटी विभागप्रमुख डॉ. देशमुख हे सुट्टीवर होते. मात्र, चिमुकल्याच्या फुफ्फुसात बी अडकल्याचा फोन आल्याने त्यांनी घाटी रुग्णालयाकडे धाव घेत चिमुकल्याच्या फुफ्फुसात अडकलेले बी 'ब्रोन्कोस्कोपी' व्दारे काढले. दिवाळीच्या आदल्या दिवशी सुट्टी असतानाही त्यांनी घाटीत येऊन एका वर्षाच्या चिमुकल्याच्या फुफ्फुसात बदामाचा तुकडा काढला होता.