

Valuables worth 5 lakhs, including gold jewellery, stolen during travel
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भाऊबीज आटोपून सासरी परतणाऱ्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि ५० हजारांची रोकड असा ५ लाख ३४ हजार ८९५ रुपयांचा ऐवज चोरट्याने पळवला. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी दुपारी हर्सल टी पॉइंट येथून सिल्लोडकडे जाताना घडली. याप्रकरणी हर्सल पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुवर्णा संतोष बेलेकर (४०, रा. सिल्लोड) या भाऊबीजेनिमित्त शहरात माहेरी आल्या होत्या. भाऊबीज आटोपल्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी दुपारी त्या मुलगा आणि मुलीसह सिल्लोडला जाण्यासाठी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास त्या हसूल टी पॉइंट येथे पोहोचल्या. येथून त्या खासगी स्विफ्ट डिझायर कारमधून सिल्लोडकडे जात होत्या. कारमध्ये चालकाच्या बाजूला एक, तर मागील सीटवर त्यांच्या शेजारी आणखी एक अनोळखी व्यक्ती बसला होता.
चौक्याच्या पुढे पोहोचल्यानंतर दुपारी २.३० वाजेच्या घाटात सुमारास पतीला फोन करण्यासाठी मोबाइल काढताना त्यांनी पर्स उघडली. त्यावेळी पर्समधील दागिने आणि रोकड ठेवलेली छोटी पर्स गायब असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विजय थोटे करीत आहेत.
दागिन्यांसह रोकडही गायब
चोरी गेलेल्या पर्समध्ये कारले मणी पोत, दोन सोन्याच्या अंगठ्या, कानातील सोन्याचे दागिने, तसेच इतर दागिने व ५० हजार रुपयांची रोकड असा ५ लाख ३४ हजार ८९५ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी हातोहात गायब केला.