

Toddler dies after drowning in a hole dug for a water pipe
नवीन जलवाहिनीचे पाईप टाकण्यासाठी ठेकेदाराने महाकाय १० ते १५ फुटांचे खड्डे खोदून ठेवले आहेत. काही खड्डे तर थेट कॉलनीच्या रस्त्याच्या मधोमध आहेत. त्याला संरक्षण जाळी नसल्याने खेळत खेळत गेलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा पावसामुळे तुडुंब भरलेल्या या खड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास देवळाई परिसरातील गट नंबर ७८, अहमदनगर येथे घडली. ईश्वर संदीप भास्कर (३, रा. दे-वळाई परिसर) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, संदीप भास्कर हे दे-वळाई भागातील अहमदनगर कॉलनीत भाड्याने राहतात. त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा ईश्वर हा घराबाहेर शेजारच्या एका लहानग्यासोबत दुपारी १२ वाजेच्या सुमारास खेळत होता. दोघे खेळत-खेळत रस्त्यावर घरापासून मुख्य रस्त्याकडे गेले. तिथे नवीन जलवाहिनीचे पाईप टाकण्यासाठी खड्डे खोदलेले आहेत.
हे खड्ड्रे पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरले आहेत. ईश्वर खेळत खेळत एका खड्यात पडला. तो पाण्याबाहेर न आल्याने त्याचासोबत लहान मुलगा घाबरून घरी पळून गेला. इकडे ईश्वर दुपारी तीन वाजले तरी घरी न आल्याने त्याच्या दुपारा आईने शोधाशोध सुरू केली. तेव्हा एका खड्याच्या पाण्यात ईश्वर तरंगतांना दिसला. त्याच्या आईने आरडाओरड केली, पण तिथे कुणीही नसल्याने तिने स्वतः खड्यात उडी मारून ईश्वरला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर काही कॉलनीतील लोकांनी धाव घेतली. त्यानंतर ईश्वरला घाटीत नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून या भागात ठेकेदाराने जलवाहिनीचे पाईप टाकण्यासाठी १० ते १२ फुटांचे खड्डे खोदून ठेवले आहेत. त्याला संरक्षण जाळी नाही. पावसामुळे सर्वत्र चिखल आहे.
चिखलातून वाट काढताना पाय घसरून खड्यात पडण्याचा धोका असल्याने ते बुजवावे, अशी तक्रार अनेकवेळा येथील रहिवाशांनी केली होती. याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर या भागातील रहिवासी रघुनाथ अंकुशकर, अब्दुल अन्सारी, सद्दाम शेख, कादिर शेख, हुसेन शेख, मुजीम पठाण यांनी संताप व्यक्त केला. तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची मागणी केली.