

Sambhajinagar News Electrification of pit line
येथील मुख्य रेल्वेस्थानकावर उभारण्यात आलेली पिट लाईन विद्युतीकरणाच्या कामामुळे रखडली आहे. हे काम एका महिन्यात पूर्ण करण्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दरम्यान या कामाला अद्यापही सुरुवात करण्यात न आल्याने या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
नुकतेच खा. डॉ. भागवत कराड यांनी पिट लाईन आणि इतर कामांची पाहणी केली होती. त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी पिट लाईनच्या विद्युतीकरणाचे काम एक महिन्यात पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते. त्याला पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला, तरीही या कामाला सुरुवात करण्यात आली नसल्याने पुन्हा ये रे माझ्या मागल्यासारखी गत झाली आहे.
येथील पिट लाईन मंजूर होण्यापासून वादात अडकलेली आहे. उशिरा मंजूर झालेली जालना येथील पिट लाईन तयारही झाली. परंतु येथील पिट लाईन अद्यापही परिपूर्ण तयार झाली नसल्याने या कामाबाबत रेल्वे प्रवाशांत नाराजीचा सूर आहे.
इतर कामांवर परिणामदरम्यान याच ठिकाणी दुसरी पिट लाईन आणि सीक लाईनचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दरम्यान अनेक दिवसांपासून केवळ विद्युतीकरणासाठी रखडलेली पिट लाईनच तयार झाली नसल्याने दुसऱ्या पिट लाईन आणि सीक लाईनच्या कामाला सुरुवातही झाली नसल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत रेल्वेच्या या दिरंगाईवर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.