

Create a sense of unity in the festival: Commissioner Pawar
गणेश विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद उत्सव सलग आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडवत शुक्रवारी (दि.५) होणारी ईद ही सोमवारी (दि.८) साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पोलिसांवर ताण कमी झाला आहे. ईदची एकच मिरवणूक निघणार आहे. बुधवारी (दि.३) पोलिस आयुक्तालयात शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी उत्सवात एकोप्याचे दर्शन घडावा, असे आवाहन केले. यावेळी डॉ. मूर्तजा, माजी महापौर गजानन बारवाल, आदिल मदने, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, पंकज अतुलकर, प्रशांत स्वामी आदींची उपस्थिती होती.
पोलिस आयुक्त म्हणाले की, मुस्लिम समाजाने एकत्रित येऊन तारीख पुढे ढकलली ही बाब कौतुकास्पद आहे. यंदा आम्ही डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करत आहोत. प्रास्ताविक करताना डीसीपी नवले यांनी यापूर्वी मिरवणुकीत गाण्यांवरून वाद झाल्याचे सांगून वादग्रस्त गाणे, घोषणाबाजी टाळावी, असे आवाहन केले. डीसीपी अतुलकर यांनी शांतेत आदर्श सण-उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले. मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी डॉ. मूर्तजा यांनी सांगितले की, शहरात नेहमीच उत्सव शांततेत होतो. आमच्या जुलूसमध्ये डीजे नसतात, नारे दिले जात नाहीत. त्यामुळे तणाव निर्माण होण्याचा प्रश्रच नाही, असे स्पष्ट केले. बैठकीला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
शहरातील सर्वानी सण-उत्सव शांततेत, आनंदात साजरे करावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. समाज कंटकांनी शहरात उपद्रव करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे. अनुचित प्रकार घडला तर डायल ११२ वर माहिती देण्याचे आवाहन केले.