

Time to sell bullocks due to drought
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा दुष्काळाच्या तीव्र झळा बसल्या आहेत. चारा-पाण्याच्या टंचाईमुळे खुलताबाद शहर व परिसरातील शेतकऱ्यांसमोर आपल्या लाडक्या बैलजोड्या विकण्याची वेळ आली आहे. शेतीचा आधार असलेले पशुधन जगवणे कठीण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, ही परिस्थिती ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत चिंताजनक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पावसाअभावी खरीप हंगामावर परिणाम झाला असून, शेतातील चारा उपलब्ध नसल्याने पशुधनाच्या संगोपनाचा खर्च वाढला आहे. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना जनावरांच्या भवितव्याची चिंता सतावत आहे. परिणामी, अनेक शेतकरी नाईलाजाने आपल्या बैलजोड्या विकण्याचा निर्णय घेत असल्याचे चित्र आहे.
या गंभीर परिस्थितीत शासनाने तातडीने प्रभावित भागात चारा छावण्या सुरू करून जनावरांना मोफत चारा, पाणी व पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना चारा खरेदीसाठी थेट आर्थिक मदत किंवा चारा अनुदान द्यावे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गावागावांत व शेतवस्त्यांवर विशेष पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी, अशीही मागणी आहे.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानभरपाईची रक्कम विनाविलंब मिळावी. कमी पाण्यात वाढणाऱ्या सुबाभूळ, मका, हायब्रीड नेपिअर यांसारख्या चारा पिकांचे बियाणे मोफत अथवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावे. रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देऊन मजुरीची रक्कम वेळेवर देण्यात यावी.
पशुधन वाचवणे म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा टिकवणे
पशुधन वाचवणे म्हणजे केवळ एका कुटुंबाचा आधार वाचवणे नव्हे, तर आगामी हंगामातील शेतीची पूर्वतयारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा टिकवणे होय. त्यामुळे शासनाने या संकटाकडे गांभीर्याने पाहून तातडीने आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.