

लासूर स्टेशन : नांदेड,मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसच्या दरवाजात बसून प्रवास करणारे तीन तरूण कामगार हातातील दारूची बाटली पकडण्याच्या नादात धावत्या रेल्वेतून खाली पडल्याची घटना शनिवारी (दि.7) सकाळी लासूरगाव जवळील ढेकू नदी परिसरात घडली. सुदैवाने तिघांचाही जीव वाचला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.आकाश म्हस्के, मोन्टी वारेकर आणि सुमित साळवे अशी जखमी तरुणांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडड्ढमुंबई राज्यराणी एक्स्प्रेसने हे तिघे तरुण छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईकडे जात होते. दरवाजात उभे राहून प्रवास करत असताना त्यांच्या हातातील दारूची बाटली खाली पडली. ती पकडण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन तिघेही धावत्या रेल्वेतून खाली पडले.
त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जवळील शेतकरी विठ्ठल दौलत शेळके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी युवकांची माहिती हडस पिंपळगाव येथील पोलिस पाटील कारभारी निघोटे यांना दिली. त्यानंतर शेळके यांनी जखमींना मोटारसायकलवरून सुमारे सात किलोमीटर अंतर पार करत जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिघांनाही गंभीर दुखापत नसल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक उपचारानंतर तीनही युवकाना रुग्णालयातून सुटी दिली. परंतु त्यांच्याकडे घरी जाण्यासाठी सुध्दा पैसे नसल्याने शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या लक्षात आले. त्यांनी जखमी युवकांना धीर देत घरी जाण्यासाठी पैसे दिले. याबद्दल रेल्वे स्टेशन मास्तर लासूर करंजगांव यांना कोणतीही माहिती नसल्याचे रेल्वे सेनेचे अध्यक्ष सोमाणी यांनी सांगितले.