

Kannad Boys Missing Case
कन्नड : शाळेत जात असल्याचे सांगून घरातून निघालेली तीन अल्पवयीन मुले रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र चिंता आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी गणेश दगडू खडेकर रा. कन्या शाळेजवळ, कन्नड यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, त्यांचा मोठा मुलगा यश गणेश खडेकर (वय १६, इयत्ता १० वी, साने गुरुजी शाळा, कन्नड) हा २९ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शाळेत जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. मात्र सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शाळेतील शिक्षक वाळुंजे यांनी यशच्या आईशी संपर्क साधून यश खडेकर, सुदर्शन अर्जुन राठोड आणि सार्थक निवृत्ती निर्मळ हे शाळेत न आल्याची माहिती दिली व पालकांना शाळेत बोलावले. शाळेत चौकशी केली असता, सहाध्यायी अर्णव सुरेश बोर्डे याने या तिघांनी मुंबईला पैसे कमविण्यासाठी जाण्याबाबत चर्चा केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचे समोर आले.
त्यानंतर पालकांनी नातेवाईक व ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला, मात्र तीनही मुले मिळून आली नाहीत. त्यामुळे त्यांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवून नेल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. यश खडेकरचे वर्णन सावळा रंग, उंची सुमारे ५ फूट ३ इंच, अंगात चॉकलेटी रंगाचा चेक शर्ट, निळी जिन्स पँट, चॉकलेटी चप्पल, सडपातळ बांधा, लांब सरळ केस असे आहे.
दरम्यान, या घटनेचा तपास शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी करत असून त्यांना सदर तिन्ही मुले कल्याण येथे असल्याचा सुगावा लागला आहे, सूर्यवंशी व पोलीस विजय चौधरी कल्याणला रवाना झाले आहेत.