

सिल्लोड : भुसार मालाचे व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे (५५, रा. बोदवड) यांच्या अपहरणाचे नाट्य अखेर भीषण हत्याकांडाने संपले आहे. शनिवारी (दि.२७ डिसेंबर) रात्रीपासून बेपत्ता असलेल्या गव्हाणे यांचा मृतदेह सोमवारी (दि.२९ डिसेंबर) पहाटे चाळीसगाव घाटात आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून छत्रपती संभाजीनगर येथून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
बोदवड येथे कृषी सेवा केंद्र चालवणारे तुकाराम गव्हाणे शनिवारी (दि. २७) दुपारी आपल्या दुचाकीवरून (MH-20, GF-0443) उंडणगाव येथे आले होते. तेथील एका व्यापाऱ्याकडून एक लाख रुपये घेऊन ते घराकडे परतण्यासाठी निघाले, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचले नाहीत. कुटुंबीयांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता.
एक कोटींच्या खंडणीसाठी फोन
दुसऱ्या दिवशी गव्हाणे यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन आला. "माझे अपहरण झाले असून, बसस्थानक परिसरात एक कोटी रुपये घेऊन ये," असे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा काकांना फोन करून दोन कोटींची मागणी करण्यात आली. या धक्कादायक फोनमुळे अपहरणाचा संशय बळावला आणि कुटुंबीयांनी तातडीने अजिंठा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलीस तपास आणि मृतदेह सापडला
घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांच्यासह वडोदबाजार पोलीस आणि गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या तांत्रिक मदतीने शोध घेत असताना, सोमवारी (दि.२९ डिसेंबर) पहाटे चाळीसगाव घाटात त्यांचा मृतदेह पोलिसांना मिळून आला.
पाच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
या हत्येचा छडा लावत पोलिसांनी पाच जणांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतले आहे. यामध्ये गोळेगाव: २ जण, पालोदवाडी: २ जण, पानवडोद: १ जणाचा समावेश आहे. या पाचही जणांनी व्यापाऱ्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घाटात फेकून दिला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हत्येचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.