

Bombay High Court Chhatrapati sambhajinagar Bench Judgment
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:
आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय एस. वाघवसे यांनी आरोपींची गुन्ह्यातून मुक्तता केली.
क्रांती चौक पोलिस ठाण्यात २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. कृष्णा प्रभाकर पोल, प्रभाकर बाबूराव पोल आणि मंगलाबाई प्रभाकर पोल यांच्या विरोधात भादंवि कलम ३०६ व ३४ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता.
गावातील वादातून झालेल्या भांडणानंतर धमक्या दिल्यामुळे सागर पोल या युवकाने छत्रपती संभाजीनगर येथे आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. मात्र न्यायालयाने तपासातील कागदपत्रांचा सखोल अभ्यास करताना, आत्महत्येच्या वेळी आरोपी आणि मृतक यांच्यात कोणताही प्रत्यक्ष संपर्क नसल्याचे नमूद केले.
शेवटची कथित धमकी आत्महत्येच्या सुमारे १६ तास आधी दिली गेली होती. तसेच आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी आवश्यक असलेली ठोस चिथावणी, उद्देश किंवा जवळीक आढळून न आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. केवळ वादाच्या भरात दिलेल्या धमक्यांवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध होत नसल्याचे नमूद करत, खंडपीठाने सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला आणि आरोपींची मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड एम एम. गुंजाळ यांच्यावतीने अॅड. अभिषेक पाटील व अॅड ऑकार शेंडकर तसेच अॅड आचल रघुवंशी यांनी काम पाहिले. सरकारतर्फे अॅड. एस. के. शिर्स यांनी बाजू मांडली.