

Assembly hall renovation: The cost of 5 crore rupees has increased to 10 crore rupees
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिकेची नाजूक आर्थिक स्थिती पुढे करीत एकीकडे प्रशासनाने पाणीपुरवठा योजनेसाठी कर्ज घेत स्वहिस्सा उभा केला. तर दुसरीकडे खर्चाला लगाम लावण्याऐवजी प्रशासनाची उधळपट्टी सुरूच आहे. गेल्या चार वर्षांपासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून या कामाचा खर्च ५ कोटींवर तब्बल १० कोटींवर गेले आहे. सर्व साहित्य निविदा प्रक्रियेप्रमाणेच असताना दुपटीने खर्च वाढलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिका प्रशासनाकडून नेहमीच नगर-सेवकांवर उधळपट्टी करण्याचा आरोप केला जातो. परंतु, मागील पाच वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक राज आहे. या काळात महापालिकेवरील कर्जाचे ओझे आणि कंत्राटदारांची देणी त्यासोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतना यांच्या थकबाकीचा आकडा तब्बल १२०० कोटींवर गेला आहे.
एवढे असतानाही महापालिका प्रशासनाने खर्चाला लगाम लावण्याऐवजी उधळपट्टी सुरूच ठेवली आहे. त्यात केवळ महापालिकेच्या नव्या सभागृहाच्या कामाचाच विचार केला. तर तब्बल तीन वर्षांत या कामाचा खर्च ५ कोटींवर तब्बल १० कोटींवर गेला आहे. एवढेच काय तर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणेच प्रशासनाने प्रशासकांना खूश करण्यासाठी त्यांच्या आयुक्त दालनाचे नूतनीकरण केले. या कामावर देखील कोट्यवधींचा खर्च केला महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असतानाच उधळपट्टी सुरूच आहे.
नव्या आर्थिक स्त्रोतांकडे दुर्लक्षच
महापालिकेवर मागील पाच वर्षापासून प्रशासक राज आहे. या काळात महापालिकेची आर्थिकस्थिती सुधारणा आणणे आणि नवे आर्थिक स्रोत तयार करणे, त्यासोबतच जुने आर्थिक स्त्रोत आणखी सक्षम करणे, याकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्षच केले. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी आणखीच खालावली आहे.
हायटेक तंत्रज्ञानावर खर्च
नव्या तंत्रज्ञानाचा करून महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि अद्ययावत सेवासुविधा देणे, यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले. परंतु, त्यावर होणाऱ्या खर्चाकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे सध्या यातील कधी सुविधांचा लाभ किती नागरिक घेत आहेत. याचे परीक्षण आता प्रशासनानेच करणे आवश्यक आहे.