

Thousands of highly educated young women took initiation into the Dhamma
छत्रपती संभाजीनगर, जे.ई देशकर
भगवान गौतम बुद्धांनी दिलेला धम्म समतेवर आधारित आहे. या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आजपर्यंत पुरूषच आघाडीवर होते, परंतु आता उच्च शिक्षित महिला, तरुणींनीही यात आघाडी घेतली असून, दरवर्षी हजारो महिला, तरुणी दीक्षा घेत आहेत.
दिवसेंदिवस श्रामनेर व श्रामनेरींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत असून, दरवर्षी हजारोंच्या आसपास महिला व त्यापेक्षाही जास्त श्रामनेर व श्रामनेरीचे प्रमाण वाढत असल्याची माहिती राज्यातील पहिले महिला भिक्खु सेंटर चालवणाऱ्या भिक्खुणी प्रा. धम्मदर्शना महाथेरी यांनी दिली.
सुरूवातीला केवळ पुरूषच (श्रामनेर) बौद्ध धम्माची दीक्षा घेत होते. पंरतु भारतात पहिलेच महिला भिक्खूनी सेंटर उपलब्ध झाल्याने दीक्षा घेण्याकडे महिलांचा (श्रामनेरी) कल वाढला आहे. भिक्खूनी सेंटरमध्ये प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर शिक्षण घेत असलेल्या व हे शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणींही असल्याची माहिती प्रा. धम्मदर्शना महाथेरी यांनी दिली.
२०१९ मध्ये भीमटेकडी येथे निर्माण झालेल्या महिला भिक्खू सेंटरमधून आजपर्यंत आठ ते दहा हजार महिलांनी श्रामनेरीची दीक्षा घेतली आहे. मराठवाड्यात बौद्ध धम्माची दीक्षा देणारे केंद्र छत्रपती संभाजीनगर आहे. या ठिकाणी बुद्ध लेणी, भीमटेकडी, लोकुत्तरा महाविहार व मुकुंदवाडी परिसरातील तक्षशिला बुद्धविहार आदी ठिकांणी श्रामनेरींची दीक्षा देण्यात येते.
श्रामनेरी शिबीर हे 10 दिवसांचे असते. यात घर, कुटुंबियांपासून पूर्णपणे वेगळे राहून ही दीक्षा ग्रहण करावी लागते. धम्मं जाणून घेणाऱ्यांची तळमळ महिलांत दिसून येत असल्याने त्या धम्म दीक्षेकडे वळत असल्याचेही समोर आले आहे. महिलांचे प्रमाण पूर्वीपासूनच नगण्य होते. आता त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार यंत्रणा कशी राबवावी यासाठी चौका घाटावर असलेल्या लोकुत्तरा महाविहरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भिक्खू संघांनी येथील भिक्खू संघाना प्रशिक्षण दिले आहे. त्यानंतरही धम्म दीक्षा घेण्याचा ओघ वाढला आहे. या प्रशिक्षणांमुळे येथील भिक्खू संघही बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी मोठा हातभार लागला आहे.
भीमटेकडीवरील महिला भिक्खूनी सेंटरमध्ये वर्षातून पाच वेळा धम्मदीक्षा देण्यात येते. यात बुद्धजयंती, विजयादशमी, धम्मपरिषद, वर्षावासाचा शुभारंभ व वर्षावासाची सांगता अशा पाच वेळा दीक्षा देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येते. असे असले तरी विजयादशमीच्या दिवशी धम्म दीक्षा स्विकारण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.