

Thousands of brass sand, reserved for the water supply project, have been stolen.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर पाणीपुरवठा योजनेसाठी गंगापूर तालुक्यातील सनव घाटात जिल्हा प्रशासनाने ९ हजार ५४० ब्रास वाळू राखीव ठेवली आहे. परंतु या वाळूवर माफियांनीच डल्ला मारला असून, दररोज या घाटातून तब्बल ४० ते ५० हायवा भरून वाळूची तस्कारी केली जात आहे. मात्र तक्रार करूनही अद्याप तहसील कार्यालयच काय तर पोलिस प्रशासनाकडूनही कुठलीच कारवाई होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यात वाळूमाफिया पुन्हा सक्रिय झाले असून, दररोज विविध घाटांतून हजारो ब्रास वाळूची मध्यरात्रीनंतर तस्कारी सुरू असते. प्रत्येक घाटात हा प्रकार सुरूच आहे. मात्र जिल्हा प्रशासन आणि गौण खनिज विभागासोबत स्थानिक पोलिसही याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वाळू तस्कर बेफान झाले आहेत.
शहरात मोठ्या प्रमाणात वाळूच्या विनाक्रमांकाच्या हायवा दररोज वाहतूक पोलिस असो या ठाण्यातील पोलिस असोत, त्यांच्या समोरून मार्गस्थ होतात. परंतु त्याकडे कानाडोळा केला जातो. जर सामान्य नागरिक विनाक्रमांकाची गाडी रस्त्याहून नेत असेल तर वाहतूकच काय तर खाकी परिधान केलेले पोलिस अधिकारीही क्षणाचाही विलंब न करता त्या वाहनधारकास अडवतात. त्याला पावती देऊन दंडात्मक कारवाई करतात, हे विशेष.
दरम्यान, शहर पाणीपुरवठा योजनेसाठी गंगापूरच्या सनव घाटातील ९ हजार ४५० ब्रास वाळू जिल्हाधिकारी कार्यालयाने राखीव ठेवली आहे. मात्र या राखीव वाळूवर राजकीय नेत्यांचे वदहास्त असलेले काही वाळूमाफिया दररोज डल्ला मारत आहेत. दररोज मध्यरात्री येथून ३० हून अधिक हायवा भरून वाळू नेली जात आहे.
तक्रारीनंतरही कारवाईकडे दुर्लक्षच
या वाळू चोरीविरोधात पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारांकडून गंगापूर पोलिस ठाणे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार देण्यात आली आहे. परंतु राजकीय नेत्यांचे वरदास्त असल्याने या तक्रारीकडे सपशेल दुर्लच केले जात आहे. त्यामुळे आता कंत्राटदारांसह अधिकारीही हतबल असल्याची चर्चा आहे.