

The Health Minister gave a positive response to the demands of the IMA.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नर्सिंग होम नोंदणीसह राज्यभरातील आरोग्यसेवा केंद्रांची वास्तविक स्थिती, त्यांच्यावरील अनावश्यक नियामक बोजे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक सुधारणा यासंदर्भात आयएमए शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची नुकतीच भेट घेत सविस्तर चर्चा केली. यावर आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, अशी माहिती अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिली.
छोटे आणि मध्यम नर्सिंग होम, क्लिनिक व डे केअर सेंटर यांच्या अडचणी, प्रशासकीय ताण आणि आवश्यक धोरणात्मक बदल याची डॉ. टाकळकर यांनी मांडणी केली. नव्या महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्याच्या मसुद्यात सर्व महत्त्वाच्या मागण्या विचारात घेतल्या जातील, असे स्पष्ट केले. तसेच, या कायद्याच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये आयएमएचे अधिकृत प्रतिनिधी असतील याची त्यांनी थेट ग्वाही दिली.
डे केअर सेंटर संदर्भात शुन्य ते पाच बेड क्षमतेच्या केंद्रांसाठी विशेष डे केअर श्रेणी तयार करण्याचा निर्णय व्यक्त केला आणि या केंद्रांवर लागू असणारे कठोर नियम शिथिल करण्याची तयारी दर्शवली. नर्सिंग स्टाफसाठी जीएनएम अनिवार्यतच्या मुद्द्द्यावर तसेच नव्या नर्सिंग होम कायद्यात सुधारणा मागवण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीसाठी डॉ. आसावरी टाकळकर, डॉ. संगीता शिंदे, डॉ. प्रशांत दरक, डॉ. संभाजी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
योजनेतील पेमेंट वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही
डॉ. टाकळकर यांनी नोंदणीची प्रक्रिया सुलभ करणे, एकसमान चेकलिस्ट, सिंगल विंडो सिस्टम, जैववैद्यकीय कचरा, बँक गॅरंटी व अन्य आर्थिक निकष प्रमाणानुसार शिथिल करण्याची सूचना मांडली. यावर आरोग्यमंत्र्यांनी अनेक प्रक्रियांच्या पॅकेजेसचे दर वाढवण्यासाठी शासनस्तरावर काम सुरू असल्याचे सांगत डॉक्टरांना योजनेतील पेमेंट प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
आयएमएच्या कार्याचे कौतुक
रुग्णसेवेसोबतच आयएमएचे अध्यक्ष डॉ. टाकळकर यांनी संस्थेला समाजकार्यातही नव्या उंचीवर नेले आहे. या बैठकीत डॉ. टाकळकर यांनी मांडलेल्या मुद्द्द्यांचे आणि आयएमएच्या कार्याचे आरोग्यमंत्रींनी कौतुक केले.