

Rs 59 lakhs looted by demolishing plot on Controversial land
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पिंगरी को ऑप. हौ. सोसायटीच्या जागेचा दिवाणी न्यायालयात वाद सुरू असताना चौघांनी प्लॉटिंग पाडून शासकीय मुद्रणालयातील नोकरदारासह अन्य नऊ जणांना इसारपावती करून देत ५८ लाख ४० हजार १३५ रुपये लुबाडून नंतर धमकावले. हा प्रकार २०२३ ते १३ डिसेंबर २०२५ या काळात पडेगावातील गट क्र. १० येथे घडला. मुकेश सुखबीर लाहोट, सुखबीर सुरजभान लाहोट, सुमित रवींद्र सौदे, विकास राजू लाहोट, अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी कचरू केशवराव नागरे (५२, रा. गट क्र. ५, रावसपुरा, पडेगाव) यांच्या तक्रारीनुसार, ते शासकीय मुद्रणालयात बांधणीकार म्हणून नोकरीला आहेत. ते राहत असलेल्या घराच्या पाठीमागे गट क्रमांक १० मध्ये अचानक साफसफाई करून प्लॉटिंग करताना दिसले. चौकशी केली तेव्हा मुकेश लाहोट याने अडीच एकर जमीन दि. को. ऑपरेटिव्ह पिअरेअरिंग सोसायटीच्या नावे असून, स्वतः अध्यक्ष असल्याचे सांगितले.
सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार माझ्याकडे असून, तुम्हाला किंवा इतरांना प्लॉट घेयचे असल्यास सांगा, असे म्हणून मोबाईल नंबर दिला. प्लॉटिंगचे सर्व कागदपत्रे, ७/१२ दाखविले. प्लॉट विक्री झाल्यावर एन ए ४४ ले आऊट मंजूर करून नवीन सोसायटी बनवून देईल, असे सांगितले. नागरे यांनी पैसे गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने प्लॉट क्र. ७ घेण्याचे ठरवले.
इसार म्हणून त्यांनी ३ लाख रुपये लाहोटला फोन पे केले. त्यानंतर वेळो-वेळी पैसे त्याला पाठवत राहिले. त्यानंतर इसारपावतीसाठी त्यांनी तगादा लावल्यावर लाहोटने वर्षभर त्यांना टाळाटाळ केली. फोन घेणे बंद केल्यावर त्याच्या घरी गेले तेव्हा त्याने शिवीगाळ करून धमकवले. नागरे यांनी घाबरून त्याच्या घरी जाणे बंद केले.
दरम्यान, शेजारी राहणारे सुदर्शन चैनसिंग राजपूत, संतोष तानाजी कासने व इतर आठ जण फसवणूक झाल्याचे सांगत एकत्र आले. सर्वांनी १६ सप्टेंबरला पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली. त्यानंतर शनिवारी (दि. १३) आर्थिक गुन्हे शाखेत फिर्याद घेऊन छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास उपनिरीक्षक नागवे करत आहेत.