

Thieves who robbed at gunpoint arrested
बिडकीन, पुढारी वृत्तसेवा चितेगाव (ता. पैठण) परिसरात चाकूचा धाक दाखवून मारहाण करत मोबाईल व ऑनलाईन रक्कम चोरणाऱ्या तीन आर-ोपींना बिडकीन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.
करण प्रकाश गिरी (२४, रा. जालना), आदित्य अमोल पगारे (२२, रा. फारोळा, ता. पैठण) व गौरव कैलास पगारे (२१, रा. फारोळा, ता. पैठण) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अविनाश लहू राठोड (२७, रा. राक्षस भुवन, ता. गेवराई, जि. बीड; ह. मु. रा. सिडको, नाशिक) यांनी बिडकीन पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली होती. मंगळवारी (दि.१०) रात्री ९.३० ते ९.४५ वाजताच्या सुमारास ते चितेगाव येथे थांबले होते. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या पोटाला चाकू लावून कॉलर पकडत जबरदस्तीने अजंठा फार्मा कंपनीमागील ओसाड जागेत नेले. तेथे त्यांना मारहाण करून १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. शस्त्राचा धाक दाखवत मोबाईलमधील फोन पे चा पासवर्ड विचारला व खात्यातील ७, २८२ रुपये काढून घेतले.
चितेगाव येथील भुतबंगला परिसरात चोरट्यांची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचला. बुधवारी रात्री साडेदहा वाजता शोधमोहीम राबविली. अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून तिघा चोरट्यांना ताब्यात घेतले. आर- ोपींनी चोरी केलेल्या मोबाईलमधील फोन-पेच्या माध्यमातून पाथ्रीकर पेट्रोल पंपावरून ७ हजार रुपये काढल्याची माहिती दिली.
पोलिसांनी आरोपींकडून १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, रोख ६,८०० रुपये, २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हॅन्डसेट, ५० हजार रुपये किमतीची विनाक्रमांक दुचाकी व मारहाणीकरिता वापरलेल्या दोन लाकडी काठ्या असा एकूण ९१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक नीलेश शेळके, पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, अजिनाथ शेकडे, गणेश खंडागळे, संजय चव्हाण, राजू चव्हाण या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.