

The tradition of eighteen years continues this year too, the goal is to make one lakh laddus
भाग्यश्री जगताप
छत्रपती संभाजीनगर: माझा एक लाडू पांडुरंगाला हा उपक्रम लोकसहभागातून मागील अठरा वर्षापासून राबविण्यात येतो. ही परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. यासाठी मनोज मोहनराव सुर्वे यांच्या परिवाराने पुढाकार घेतला होता. सुरुवात झाली तेव्हा २५ ते ५० लोकांच्या हातांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाडू बनविले जात होते. त्यात लोकांचा सहभाग वाढला असून, आता हज ारोंच्या हातांनी लाडू बनविले जात आहेत. यंदा एक लाख लाडू बनविण्यात येणार असल्याची माहिती मनोज सुर्वे यांनी दिली.
आषाढी एकादशीची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी हरी विठ्ठल असा गजर करत दिंडी देखील निघाल्या आहेत. त्यात शहरात अनोख्या पध्दतीने उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.
यंदा एक लाख लाडू बनविण्यात येणार आहे. सद्गुरू डॉ. मंगलनाथ महाराज व पुरुषोत्तम महाराज यांच्या आशिर्वान हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने आषाढी एकादशीनिमित्त २९ जून रविवार रोजी पाटीदार भवन येथे गुळ शेंगदान्याचे एक लाख लाडू बांधण्यात येणार आहे. यात शहरातील हजारो हात पुढे आले असुन हजारोंच्या हातांनी माझा एक लाडू पांडुरंगाला हा उपक्रम राबविला जात आहे.
अभिजित शिंदे आणि सरला शिंदे यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तर सायंकाळी ४ ते ६ यावेळेत कीर्तनकार सविता मुळे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. आषाढी एकादशीच्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे सर्व वारकऱ्यांना गुळ शेंगदान्याचे लाडू, शाबुदाना खिचडी व भगर आमटीचा महाप्रसाद देण्यात येणार आहे.
द्वादशीला सकाळी ८ वाजता श्री पांडूरंग रूख्मीणी यांना महाप्रसादाचा नैवद्य दाखवून सर्व वारकरी यांची महा पंगत बसते, तनपुरे महाराज मठ येथे पुरण पोळी, आमटी, भजे, भात, पापड, व गुलाब जामून असा महाप्रसाद असतो. सर्व वारकरी या महाप्रसादाचा लाभ घेतात. ही परंपरा यंदाही कायम ठेवली जाणार आहे. यासाठी डॉ. भैरव कुलकर्णी, लक्ष्मीकांत सुर्वे, जगन्नाथ गिते, योगेश कोडगीरे, प्रदिप राठोड, विलास गायकवाड, उदय चावडा यांचे सहकार्य असते.
पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होत भाविक लाडू बनवितात. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिकतेचे दर्शन घडवीत लाडू वनविले जाणार आहे. त्यात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषा साकारून लहान मुले असतात. याशिवाय भजनी मंडळी टाळ-मृदंगांचा गजर करत पारंपरिकतेचे दर्शन यातून घडवीत दिंडीत सहभागी होतात. ही परंपरा यंदाही कायम ठेवली जाणार आहे.