

All encroachments on Jalna Road will be razed to the ground Bench refuses to stay order
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : मुकुंदवाडी ते चिकलठाण्यापर्यंतच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यास मंगळवारी (दि.२४) खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे आता गुरुव ारपासून (दि. २६) या मार्गावर पुन्हा पाडापाडीला सुरुवात होणार असून, दोन्ही बाजूंनी असलेली सर्व अतिक्रमणे भुईसपाट केली जाणार आहेत. यात सुमारे ३५० हून अधिक अतिक्रमणांची संख्या असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहे.
महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांसह सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बीड बायपासवर शेकडो अतिक्रमणे हटविण्यात आली. जालना रोडवरील अतिक्रमणधारकांनी स्वतः होऊन अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी केले होते. या मोहीमेत मुकुंदवाडी ते चिकलठाणा या रस्त्यावर कारवाईची तारीख निश्चित करण्यात आली होती.
परंतु, त्यापूर्वीच मुकुंदवाडी चौकात खुनाची घटना घडली. या घटनेनंतर महापालिका व पोलिसांनी या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेत २० जूनाला संयुक्त कारवाई केली. यात परिसरातील हॉटेल, चिकन-मटनची दुकाने, टपऱ्या असे तब्बल २२९ अतिक्रमणे जमीनदोस्त केले.
या कारवाईनंतर अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. सोमवार (दि. २३) व मंगळवार (दि.२४) दोन दिवस न्यायालयात सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने मोहिमेला स्थगिती देण्यास नकार दिला. यातील काही जणांना ४८ तासांचा वेळ अतिक्रमणे काढून घेण्यासाठी देण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेने गुरुवारपासून पुन्हा या मार्गावर कारवाईचा निर्णय घेतला आहे, असे अतिक्रमण हटाव विभागाचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले.