

The supplier of narcotic syrup was arrested in Latur, and four thousand bottles were seized
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नशेच्या सिरप सिंडिकेटचा जीवावर उदार होऊन गुन्हे शाखेच्या पथकांनी शनिवारी (दि.२४) रात्री थरारक पाठलाग करून तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. मुख्य सूत्रधार अशपाक पटेल हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र गुन्हे शाखेने लातूर येथून पुरवठादार सय्यद शाहिद अली सय्यद इब्राहिम अली (३०, रा. एसटी कॉलनी, उदगीर, जि लातूर) याच्या गंजगोलाई भागातून मुसक्या आवळल्या. त्याने ट्रान्सपोर्टने मागविलेल्या सिरपच्या ४ हजार ८० बॉटल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी मंगळवारी (दि. २७) दिली.
अधिक माहितीनुसार, २४ जा नेवारी रोजी रात्री ९:२० च्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक केंब्रिज चौकात वाहने तपासत असताना तवेरा कारला (एमएच-१२-एचएन-९९१७) थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र चालकाने गाडी न थांबवता सावंगी रोडने पलायन केले होते. पोलिसांनी १५ किलोमीटर पाठलाग केल्यावर आरोपींनी सावरकर चौक आणि टीव्हीसेंटर परिसरात पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अंमलदार गणेश सागरे जखमी झाले होते, तर अंमलदार दादासाहेब झारगड यांनी जीवावर उदार होऊन थेट आरोपींच्या गाडीवर उडी घेऊन काठीने काच फोडली होती.
अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून तिन्ही आरोपींना झटापटीनंतर ताब्यात घेत ३००० बाटल्या जप्त केल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक अर्जुन कदम, हवालदार योगेश गुप्ता, राजेंद्र साळुंके, श्रीकांत काळे, मनोहर गीते, विलास मुठे, संतोष चौरे यांच्या पथकाला लातूर येथे रवाना केले होते. पथकाने मेडिकल चालक शाहिदला अटक करून त्याच्याकडून ४ हजार कोडीन सिरपचा साठा जप्त केला.
अशपाक पटेल सिंडिकेटचा मोहरक्या
शहरातील कुख्यात तस्कर अशपाक पटेल याने नशेचे सिरप विक्रीचे सिंडिकेट तयार केले होते. उदगीरच्या शाहिदमार्फत तो मोठ्याप्रमाणात कोडेनच्या बाटल्या मागवीत होता. लातूर येथे जप्त केलेल्या ४०८० बाटल्यांचा साठा हा पटेलला देण्यासाठीच ट्रासनपोर्टने लातूरला शाहिदने मागविला होता. शाहिद गुजरातच्या कंपन्यामधून माल मागवून लातूर येथून थेट शहरात पाठवत होता.
मेडिकल बंद करून तस्करी सय्यद शाहिद याचे डी फार्मसीची पदवी घेतलेली असून, त्याच्याकडे मेडिकलचा स्वतःचा परवाना आहे. उदगीर येथे त्याने मराठवाडा मेडिकल नावाने व्यवसाय सुरू केला होता. मात्र तो अंमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात आल्याने त्याने काही महिन्यांपूर्वी मेडिकल बंद केले होते. त्या जागेत सध्या हार्डवेअरचे दुकान सुरू आहे. मात्र शाहिदने त्याच पत्त्यावर मेडिकल सुरू असल्याचे भासवून तस्करांना नशेसाठी सिरप, गोळ्यांचा पुरवठा करत असल्याचे समोर आले. अशपाक पटेलच्या घरी झडती रॅकेटचा मुख्य सूत्रधार अशपाक पटेल फरार आहे. त्याच्या घरी गुन्हे शाखेने मंगळवारी झडती घेतली. परिसरातील नागरिकांना त्याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक कदम, अंमलदार झारगड यांनी लाऊडस्पिकरद्वारे केले.
चंपा चौकात काढली धिंड
पोलिसांनी शेख समिर राजासाब (२४), उमर अब्दुल साहाब शेख (३६, दोघे रा. लातूर) आणि सय्यद अल्ताफ वहाब (२३, रा. उदगीर, जि. लातूर) या तिघांना शनिवारी अटक केली होती. तर पुरवठादार शाहिदला मंगळवारी बेड्या ठोकल्या. या चौघांनाही पोलिसांनी चंपा चौक आणि चेलीपुरा भागात नेले. पोलिसांनी या तस्करांना खाकीचा इंगा दाखवत त्यांची भरचौकात येथेच्छ धुलाई करत धिंड काढली. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे तस्करांचे धाबे दण-ाणले असून, नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे