

The sky lit up with a storm of fireworks
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा घरोघरी फुलांच्या सुवासिक तोरणमाळा, अंगणात विविध रंगांच्या आकर्षक रांगोळ्या आणि लक्ष लक्ष दिव्यांच्या तेजोमय झगमगाटात रविवारी (दि. ८) शहरात दिवाळीचा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. तत्पूर्वी, सायंकाळी गोरज मुहूर्तावर घरोघरी मंगलमय वातावरणात लक्ष्मी व कुबेर पूजन उत्साहात पार पडले. व्यापारी वर्गानेही दुकानांमध्ये विधीवत लक्ष्मी पूजनासह नव्या हिशेब वह्यांचे (चोपड्यांचे) पूजन केले. यानंतर फटाक्यांच्या तुफान आतषबाजीने अवघे आसमंत उजळून निघाले.
यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन रविवारी एकत्र आले. यात लक्ष्मीपूजनानिमित्त रोकड धनराशी, दागदागिने, सोन्या-चांदीच्या शिक्क्यांवरील लक्ष्मीच्या छाप्यांची आणि फटाक्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. यासोबतच पूजेत नारळ, लाह्या, बत्तासे, चणे, गूळ, करंजी, लाडूचा प्रसाद आणि केरसुणी यांची देखील मांडणी केली जाते.
व्यापारी वर्गात चोपडी पूजन केले जाते. त्यानुसार रविवारी घरोघरी आणि दुकानांत पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी पूजन व कुबेर पूजन करण्यात आले. लक्ष्मी पूजनानिमित्ताने सर्वत्र मोठ्या हर्षोल्हासाचे वातावरण होते. पहाटेपासूनच मांगल्य आणि उत्साहाचा सुगंध दरवळत होता. घरासमोर शेणाचा सडा टाकत त्यावर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या.
केळीचे खांब, आंब्याच्या पानांची, झेंडूच्या फुलांची तोरणे बांधली. सांयकाळी मिणमिणत्या पणत्या, रांगोळ्या व फुलांच्या सुगंधात शहर आणि परिसरात लक्ष्मी पूजन सोहळा मंगलमय वातावरणात उत्साहात झाला. घरोघरी सहकुटूंब, व्यावसायिक-व्यापाऱ्यांकडून लक्ष्मी पूजनात दुकानांच्या व्यवहारासाठी असलेल्या नव्या हिशेब वही खात्यांचे (चोपड्यांचे) पूजन केले. यानंतर एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत फटाके फोडल्याने आसमंत उजळून दीपोत्सवाचा नजराणा पाहायला मिळाला.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत लाभ मुहूर्त होती. तर मुख्य शुभ आणि सर्वोत्तम मुहूर्त संध्याकाळी ०५:५४ ते रात्री ०७:५० पर्यंत होता. या प्रदोष मुहूर्तावर घरोघरी लक्ष्मीपूजन करण्यात आले. यानंतर ८.१५ पर्यंत लाभ मुहूर्तावर व्यापारी, दुकानदारांनी वहीपूजन केले. अमृत मुहूर्त रात्री १० वाजेपर्यंत उत्तम आरोग्य, सुख-समृद्धीची मनोकामना करत व्यवसायात भरभराटाची प्रार्थना करण्यात आल्याचे पुजारी प्रवीण कुलकर्णी यांनी सांगितले.