

Grand start to the festival of lights (Deepotsav)
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजनाने बुधवारपर्यंत चालणाऱ्या दीपोत्सवाला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. दिवाळीनिमित्त घराघरांत आकर्षक सजावट, रंगीबेरंगी रांगोळ्या, पणत्यांची रोषणाई आणि विद्युत दिव्यांची सजावट करण्यात आली होती. सायंकाळी शुभमुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करून सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.
गुरूवारी वसुबारस, शुक्रवारी धन्वतंरी जयंतीने दिपोत्सवाला सुरवात होत असली तरी नरकचतुदर्शी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज हे महत्वाचे दिवस आहेत. त्यामुळे रविवारी उत्साहाचे वातावरण होते. दुष्काळाचे सावट असले तरी लोकांमध्ये दिवाळीचा उत्साह कायम होता. शासनाने दिवाळीसाठी पाच हजारांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली होती, तसेच दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थाही सरसावल्यामुळे ग्रामीण भागातही दीपोत्सवाचा उत्साह होता.
परंपरा, श्रद्धा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा सुंदर संगम साधत सर्वत्र दीपोत्सवाचा आनंद ओसंडून वाहत होता. रविवारची सकाळ घराघरांत अभ्यंगस्नानाच्या प्रसन्न वातावरणाने उजाडली. पहाटेपासूनच घरांमध्ये उत्साहाची लगबग सुरू होती. अंगणात आकर्षक रांगोळ्या काढून, फुलांच्या तोरणांनी प्रवेशद्वारे सजवून घरांना मांगल्याचे रूप देण्यात आले. देवघरात दीपप्रज्वलन करून आरती करण्यात आली. त्यानंतर घरासमोर पणत्या, समया आणि आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून टाकण्यात आला.
दिवाळीच्या फराळाने सणाचा गोडवा अधिकच वाढवला. चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे अशा विविध पदार्थांचा आस्वाद घेत कुटुंबीयांनी एकत्रितपणे आनंदाचे क्षण अनुभवले. नातेवाईक, मित्रमंडळी आणि शेजाऱ्यांना फराळ देत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
अनेकांनी कुटुंबीयांसह मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले. सायंकाळ होताच घरांच्या उंबरठ्यांवर, खिडक्यांमध्ये आणि अंगणात लावलेल्या पणत्यांच्या रोषणाईने शहरातील प्रत्येक परिसरात दीपोत्सवाचे देखणे चित्र करून नवीन हिशेबवह्यांचे पूजन केले. अनेक ठिकाणी
उद्या पाडवा, बुधवारी भाऊबीज
दिवाळीच्या पर्वातील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दिवाळी पाडव्याचा सण मंगळवारी साजरा करण्यासाठी घराघरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर बहिण भावाचे नाते दृढ करणारा भाऊबीज सण बुधवारी साजरा होणार आहे. या दोन्ही सणांसाठी खरेदीचे वेध लागले असून बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. अनेक कुटुंबीयांनी लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर पर्यटनस्थळी अथवा पाहुण्यांकडे जाणे पंसत केल्याचे चित्र आहे.