

The Shiv Sena Shinde group achieved a resounding victory in Paithan.
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : पैठण नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या भूषण कावसानकर यांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांनी उबाठाच्या अपर्णा दत्तात्रय गोर्डे यांचा पराभव केला. कावसानकर यांना १२ हजार ५०० मते मिळाली, तर गोर्डे यांना ८ हजार ७८९ मते मिळाली. या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात व शहरात शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.
या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेऊनही भाजपच्या उमेदवार मोहिनी सुरज लोळगे यांचा पराभव झाल्याने स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना अतिआत्मविश्वास नडला असल्याची चर्चा शहरात होत आहे.
शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या २५ जागांपैकी १७ जागा शिंदे शिवसेना गटाने पटकावल्या. तर कॉंग्रेसने चार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दोन, भाजप एक, उबाठा एका जागेवर विजयी झाले. नगरपरिषदेत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविले.
सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, न.प. मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक एक मधील व नगराध्यक्षपदाची मतमोजणी पार पडली. प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेना शिंदे गट कविता शेखर शिंदे व विलास आडसूल भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या फेरीपासून शिवसेनेच्या विद्या भूषण कावसानकर यांनी आघाडी घेतली होती. टप्प्याटप्प्याने दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण झाली. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या भूषण कावसानकर यांच्यासह सेनेचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाल्यानंतर खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांचे नेच्या कार्यकत्यांनी भूम भूम भुमरे, भुमरे साहेब यांचा विजय असोच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी विजयी उमेदवारांची खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.