

Future corporators scramble for pavilions, bands, and rickshaws
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवाः महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून, भावी नगरसेवक आजपासूनच प्रचाराचे नियोजन करत आहेत. यासाठी लागणारा मंडप, बँड, रिक्षा या बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू असून, अनेकांनी याची बुकिंग करून ठेवली आहे. याच रणधुमाळीत उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशातून सुमारे ५०० पेक्षाही जास्त कामगार शहरात दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
अनेक इच्छुकांनी विविध पक्षांकडे मुलाखती दिल्या आहेत. ज्यांना तिकीट निश्चित मिळणार असे भावी नगरसेवक प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. सभा, पदयात्रा, कॉर्नर सभा, शक्तिप्रदर्शन यासाठी लागणारे साहित्य मंडप, बँड, साऊंड सिस्टीम, रिक्षा आणि वाहन व्यवस्था यांची जुळव ाजुळव करण्यासाठी धावपळ करत आहेत. शहरात सुमारे दीड हजारांपेक्षाही जास्त मंडप व्यावसायिक आहेत.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि गटांकडून मंडप, स्टेज, खुर्चा, एलईडी स्क्रीन, बॅनर यांची आगाऊ बुकिंग करण्यात येत आहे. अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंगही केली आहे. बँडसह मंडपलाही मागणी चांगली राहणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष भगवानराव शिंदे यांनी दिली.
परराज्यांतील कामगार दाखल
निवडणुकीच्या कामासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची गरज वाढल्याने मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात कामगार शहरात दाखल झाले आहेत. मंडप उभारणी, विद्युत काम, सजावट यासाठी या कामगारांचा उपयोग होत असून, त्यांना काही महिन्यांचा स्थिर रोजगार मिळत आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे. खास मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथून शहरात मजूर येत असून, आतापर्यंत ५०० ते ६०० कामगार शहरात आले आहेत.
बँड, ढोल-ताशा पथकांकडे विचारणा
प्रचार रॅली, मिरवणूक आणि विजयाच्या जल्लोषासाठी बँड पथक, ढोल-ताशा पथकांकडे विचारणा केली जात आहे. तसेच प्रचार कार्यासाठी रिक्षा चालकांकडे विचारणा सुरू झाली आहे. निवडणुकीमुळे या छोट्या व्यावसायिकांना रोजगारांची संधी उपलब्ध झाली आहे, अशीही माहिती शिंदे यांनी दिली.