

The price for land acquisition for Satana MIDC is Rs. 51 lakh per acre.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सटाणा येथी एमआयडीसीसाठी १०९ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. ही जमीन ५१ लाख ९० हजार रुपये प्रतिएकर या वाटाघाटीच्या दराने घेण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनासोबतच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक झाली. यात वरील निर्णय घेण्यात आला. १५० शेतकऱ्यांची १०९ हेक्टर म्हणजेच २७२ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. गंगापूर तालुक्यातील आरापूर व इतर गावांतील जमीन विस्तारीकरणाच्या अनुषंगाने घेण्याचा निर्णय झाल्यानंतर आता सटाणा येथील जमीन घेण्यात येणार आहे.
मराठवाड्यात ११ नवीन एमआयडीसींचा विकास करण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे. यात ६ एमआयडीसी बीड जिल्ह्यात, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सटाणा, अंबेलोहळ, आरापूर आणि सिल्लोड या ४ नवीन एमआयडीसींचा समावेश आहे. जालना येथे नव्याने अतिरिक्त जालना नावाने आणखी एक एमआयडीसी प्रस्तावित आहे.
सध्या शहरात आणि शहरालगत पाच एमआयडीसी आहेत. यामध्ये रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, वाळूज, चित्तेगाव आणि शेंद्रा औद्योगिक वसाहतींचा समावेश आहे. आता आरापूर, सटाणा या भागात एमआयडीसीचा विस्तार होतो आहे.