

Sambhajinagar Notorious gangster tipya police arrest
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जेलमधून सुटताच व्यावसायिकाला तलवार लावून दोन लाखांची रोकड लुटणाऱ्या कुख्यात गुंड जावेद ऊर्फ टिप्या महिनाभरापासून फरार होता. त्याच्या टोळीतील अन्य चार गुंडांना पोलिसांनी पकडले होते. मात्र टिप्या पोलिसांच्या हाती न लागता थेट न्यायालयात शरण आला होता.
त्याला मंगळवारी (दि.९) हर्सल कारागृहातून पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गुरुवारी त्याची दहशत असलेल्या गारखेडा भागातील गल्ल्यांमधून हातकड्या घालून धिंड काढली. तरीही टिप्याचा माज कायम होता. त्याच्या बहिणीने पोलिसांसमोर नागरिकांना दमदाटी, शिवीगाळ केल्याने अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.
गुंड टिप्याची गारखेडा भागात दहशत आहे. टोळीमार्फत तो गंभीर गुन्हे करतो. त्याच्यावर खून, दरोडा, अपहरण, जीवघेणे हल्ले, लूटमार असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का, एमपीडीए अशा कारवाया करूनही तो सुधारला नाही. जेलमधून सुटल्यानंतर काही दिवसांत त्याने बायपासवर एका व्यापाऱ्याला तलवार लावून लुटले.
त्याला हर्मूल जेलमधून ताब्यात घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, एपीआय शिवप्रसाद कहऱ्हाळे, उपनिरीक्षक विनोद भालेराव, कोळेकर, अंमलदार वाघ, विजय लकवाल, निकम, राठोड, देवकर यांनी भारतनगर, गारखेडा भागात गल्लोगल्ली हातकड्या घालून धिंड काढली. त्याला बघण्यासाठी घरा-घरांतून लोक रस्त्यावर आले होते. मात्र टिप्याच्या चेहऱ्यावर माज कायम दिसत होता.
साईनगर कमानीजवळ टिप्याच्या समोर गेल्यानंतर टिप्याच्या बहिणीने जोरजोरात रस्त्यावरच शिवीगाळ सुरू केली. बघ्यांची गर्दी जमल्याने ती लोकांना दमदाटी करून हुसकावून लावू लागली. एका किराणा दुकानाचे शटर बळजबरीने बंद केले. तिला पोलिसांनी समज दिली. मात्र ती ऐकत नव्हती. दरम्यान, पंचनामा करून पोलिसांनी टिप्याकडून एक दुचाकी, पॅन्ट असा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर रात्री त्याच्या बहिणीवर पुंडलिकनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला.