

The pathetic condition of the veterinary clinic in Fulambri
धनंजय सिमंत
फुलंब्री शहरात असलेल्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था झाली आहे. येथील दवाखान्यात विविध सुविधांचा अभाव आहे. इमारतीलची झालेली पडझड, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्याच्या दिवसात विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासकीय जनावरांचा दवाखाना येथे नसल्यातच जमा आहे यामुळे शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरकडून आपल्या जनावरांवर उपचार करावा लागतो यात शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान होत आहे. पशु दवाखाना असाच उकिरड्यात आहे, त्याची सर्व पडझड झालेली आहे यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी येथे येत नाही, यात शासन कुठलेच औषधी पुरवत नसल्याची बाब समोर येत नसल्याने शेतकऱ्यांत संताप आहे. आता जनावर तपासणी करणे म्हणजे ही एक धास्तीच शेतकऱ्यांनी घेतली आहे. पावसाळ्यात जनावरांना खुरकत, तोंड येणे यासह विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.
यामुळे या काळात जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. इतर वेळी पशुवैद्यकीय दवाखान्यात शेतकरी फिरकत नाहीत परंतु पावसाळ्यात जनावरांची निगा राखावी लागते. परंतु शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याचे खस्ता हाल असल्याने पशुवैद्यकीय अधिकारीसुध्दा दवाखान्यात फिरकत नाही. यामुळे पशुपालकांना नाईलाजाने खासगी डॉक्टरकडे पशुंना दाखवावे लागत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात. दवाखानाच सुरू नसल्याने अनेक मेडिकल चालकांनी केवळ जनावरांची औषधी विक्री करत आहेत. शासकीय जनावरांच्या दवाखान्यात काही आजारावर मोफत औषधी मिळत होते मात्र, पशुवैद्यकीय दवाखान्यात कुठलीच औषधी मिळत नसल्याचे पशुलपालक सांगत आहेत.
पशुपालकांची लूट जनावरांना गोचीड लागण, खुरकत तोड येणे आदी आजारांवर शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात औषध मोफत मिळत होते. इमारतीची खस्ता हाल आणि औषधीच नसल्याने पशुपालक खासगी डॉक्टरांकडून पशुवर उपचार करत आहेत. विशेष म्हणजे खासगी डॉक्टर व मेडिकल दुकानदार यांची सांगड असल्याने गरज नसताना भरमसाठ औषधी लिहून दिली जातात. यामुळे पशुलपाकांची आर्थिक लूट सुरू आहे. पशुंवर उपचार करणारे एकही डॉक्टर पदवीधर नाहीत याकडे पशुवैद्यकीय विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.