

ZP Election: Seven thousand EVMs are required, only two thousand are available
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात लवकरच जिल्हा परिषद, पंचायत आणि महानगरपालिका व नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. परंतु या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाला मतदान यंत्रांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण ७१८८ बॅलेट युनीट (बीयू) मशीन्सची गरज असताना प्रशासनाकडे केवळ २२१४ बीयूच उपलब्ध आहेत. त्यातही २०७ बीयू मशीन्स या नादुरुस्त आहेत.
राज्यात पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या नाहीत. आधी कोरोना महामारी आणि नंतर ओबीसीच्या राजकीय आर-क्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्याने या निवडणुका लांबणीवर पडल्या. सद्यस्थितीत राज्यातील सुमारे ६३० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका सप्टेंबरपर्यंत घेण्याचे आदेशित केले आहे. असे असले तरी गरजेनुसार निवडणूक आयोग काही दिवसांची मुदतवाढ मागू शकतो, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत किंवा दिवाळीनंतर लगेचच या निवडणुकांचा बिगूल वाजण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर गेल्या दोन महिन्यांपासून निवडणूक पूर्व तयारीच्या कामाला वेग आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच एक बैठक घेऊन मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यात मतदानयंत्रांच्या कमतरतेचा मुद्दा अब- ोरेखीत झाला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकूण १८ लाख ७० हजार मतदान असणार आहे.
या निवडणुकीसाठी २८७६ कंट्रोल युनिट (सीयू) आणि ७१८८ बीयू लागण्याचा अंदाज आहे. परंतु त्या तुलनेत जिल्ह्यात सध्या केवळ २३८८ सीयू आणि २२१४ बीयू उपलब्ध आहेत. कंट्रोल युनिटपेक्षा बॅलेट युनिट म्हणजे ज्यावर प्रत्यक्ष मतदार मतदान नोंदवितो त्या मशीन्सचा खूप अधिक प्रमाणात तुटवडा आहे. जवळपास ५ हजार बीयूचा तुटवडा आहे. विशेष म्हणजे राज्यात एकाचवेळी सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्याने इतर जिल्ह्यातून या मशीन्स मिळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत परराज्यातून या मशीन्स मिळविण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाकडून सुरू असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात सध्या २३८८ सीयू आणि २२१४ बीयू उपलब्ध आहेत. त्यातील २६५ सीयू आणि २०७ बीयू नादुरुस्त आहेत. प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात आणखी ७५३ सीयू आणि ५१८१ बीयूची आवश्यकता आहे. यासोबतच मतदान यंत्रांसाठी लागणाऱ्या मेमरी चिप्सचा तुटवडा आहे. जिल्ह्यात १२३९ मेमरी चिप्स उपलब्ध असून आणखी १६६७ मेमरी चिप्सची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.