

The municipal corporation's tax collection crosses Rs. 200 crore
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीत २०० कोटींपार गेली आहे. दहा महिन्यांत प्रशासनाने २०० कोटी १० लाख रुपयांची वसुली केली असून पुढील दोन महिन्यांत आणखी १०० ते २०० कोटींच्या कर वसुलीचा निर्धार करमूल्य निर्धारक व संकलक विभागाने केला आहे.
संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर मुख्य प्रशासकीय मारत महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीवर प्रशासनाने यंदा विशेष भर दिला. त्यातूनच यावेळी प्रशासक जी. श्रीकांत यांनी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शास्ती से आझादी आणि शास्ती से मुक्ती या दोन योजना राबवल्या.
पहिल्या योजनेत थकीत मालमत्ता कराच्या शास्तीवर ९५ टक्के सूट देण्यात आली, तर दुसऱ्या योजनेत ७५ टक्के सूट देण्यात आली. त्यानंतर थकीत कराच्या शास्तीवर पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय देखील पालिकेने घेतला. त्याशिवाय कर वसुलीची यंत्रणा अद्ययावत करण्यात आली.
या सर्वांचा परिणाम म्हणून एक एप्रिल २०२५ ते २३ जानेवारी २०२६ या दरम्यान मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची वसुली २०० कोटी १० लाख ७४ हजार २०९ रुपये झाली आहे. त्यात मालमत्ता कराच्या माध्यमातून वसूल झालेल्या १८३ कोटी १५ लाख ७ हजार ४८४ रुपये रकमेचा समावेश आहे, तर १६ कोटी ९५ लाख ६६ हजार ७२५ रुपये पाणीपट्टीचा समावेश आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कर वसुलीची आकडेवारी दोनशे कोटींपार गेली आहे.