

The Municipal Corporation will focus on tax collection to boost its revenue.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असल्याने अनेक विकासकामांना कात्री लावावी लागते. या प्रकाराला कायमचा ब्रेक लावण्यासाठी सर्वप्रथम महापालिकेच्या कर वसुलीवर लक्ष देत उत्पन्न वाढविणार असल्याचा निर्धार स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती अनिल मकरिये यांनी गुरुवारी (दि.१२) पदभार स्वीकारताच केला. तसेच महापालिकेच्या उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याकडेही लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.
महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध ५ विषय समितींच्या सभापती पदासाठी गुरुवारी निवड प्रक्रिया झाली. यात स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे मकरिये यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी सभापती पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर महापालिकेच्या उत्पन्न वाढीबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत हे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली आहे, परंतु कर वसुली शंभर टक्के होत नाही. अनेक मालमत्ताधारक वर्षानुवर्षे कराचा भरणाच करीत नसल्याचे प्रकार घडत आहेत. करातून महापालिकेला उत्पन्नच मिळणार नसेल तर शहरात विकासकामे कशी होणार, कामे करायची असेल तर कर वसुली गरजेची आहे.
दरम्यान, कर वसुलीसाठी विविध मोहीम राबविण्यात येतील. ज्या मालमत्ताधारकांनी वर्षानुवर्षांपासून कर भरण्यास टाळाटाळ केली आहे, त्यांच्या याद्या तयार करून सर्वप्रथम त्यांच्याकडून कर वसूल करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी मालमत्ताधारकांचा सतत पाठपुरावा करण्याच्या सूचना कर वसुली विभागाला दिल्या जाईल.
यावरही कर भरणा करण्यास टाळाटाळ केलीच तर त्या भागातील विकासकामांना ब्रेक लावण्यात येईल, असे सभापती मकरिये म्हणाले. यासोबतच वर्षानुवर्षांपासून उत्पन्नाच्या त्याच जुन्या स्रोतांवर प्रशासनाला अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी नवे स्रोत तयार करता येईल का, याचाही विचार करण्यात येईल, असे नवनिर्वाचित सभापती मकरिये यांनी सांगितले.
सभापतींना ऐनवेळी दुसरे दालन
स्थायी समिती सभापती यांच्या दालनाच्या नूतनीकरणाचे काम ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आले. त्यामुळे आता त्यांच्या दालनाचे काम पूर्ण होण्यासाठी किमान एक आठवडा लागणार असून, पुढील आठ दिवस सभापतींनी बसावे कुठे, असा सवाल उपस्थित होत असतानाच महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी ऐनवेळी रात्रीतून स्थायी समिती सभापतींसाठी सभागृहनेत्यांचे दालन उपलब्ध करून दिले.