

Mob Attacks the Home of Kirtankar Wadekar Maharaj
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: खग्रास चंद्रग्रहणाच्या नियमांवरून गर्भवती महिलेवर कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांनी भाष्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत संतापलेल्या जमावाने मंगळवारी (दि.१०) रात्री गांधेली परिसरातील महाराजांच्या घरावर हल्ला चढवला. यावेळी वाडेकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अधिक माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या खग्रास चंद्रग्रहणादरम्यान एका गर्भवती महिलेने ग्रहणाचे नियम (वेधादी नियम) पाळले नसल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओवर निवृत्ती महाराज वाडेकर यांनी आपल्या कीर्तनातून कडक शब्दांत टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, ज्यावरून एका विशिष्ट वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
या वादाचे पर्यावसान मंगळवारी रात्री हिंसक घटनेत झाले. संतप्त जमावाने गांधेली येथील महाराजांच्या निवासस्थानी धाव घेत थेट घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावाकडून अर्वाच्य घोषणाबाजी करत कुटुंबाला धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रयत्न झाला. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिस संरक्षणाची मागणी
या हल्ल्याच्या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत वाडेकर महाराज यांनी ग्रामीण पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.