

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
कोकणवाडी चौक ते देवगिरी महाविद्यालय या रस्त्यावर १७ दुकानदारांनी अतिक्रमण वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. याबाबत अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांना तक्रार प्राप्त होताच बुधवारी (दि.१०) महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने धडक मोहीम राबविली. पथकाने अतिक्रमण जमिनदोस्त करीत रस्ता मोकळा केला.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशाने अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी अतिक्रमण हटाव विभागाने शहरातील कोकणवाडी चौक ते देवगिरी कॉलेज रोडवर जैस्वाल भवनसमोर धडक मोहीम राबविली.
या मोहिमेत पथकाने या रस्त्यावर अतिक्रमण करून थाटण्यात आलेल्या १७दुकानांचे शेड आणि पक्क्या बांधकामांवर जेसीबी चालवून जमीनदोस्त केले. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. ही कारवाई स्वतः अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख सनियंत्रण अधिकारी वाहुळे, सहाय्यक आयुक्त अतिक्रमण संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ व नागरी मित्र पथक कर्मचाऱ्यांनी केली.