

Shinde's solution to the dispute between Shirsat and Janjal.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शिंदेंच्या शिवसेनेत स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर गृहकलह निर्माण झाला होता. पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर मनमानी कारभाराचे जाहीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि.१०) रात्री नागपूर येथे बैठक घेतली. यात महापालिका निवडणुकीच्या पक्षीय कामकाजासाठी समिती नियुक्त करण्यात आली.
नागपूर येथे एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी या शासकीय बंगल्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास बैठक पार पडली. बैठकीला शिंदे यांच्यासह पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, त्रयीकेश जैस्वाल यांची उपस्थिती होती. या बैठकीत शिंदे यांनी सविस्तर चर्चा केली.
त्यापाठोपाठ लगेचच दुसरी बैठक घेण्यात आली. या बैठकीला वरील सर्वांसोबतच आमदार विलास भुमरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, त्र्यंबक तुपे यांचीही उपस्थिती होती. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वांनी एकमेकांना विश्वासात घेऊन काम करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. तसेच या कामकाजासाठी संयुक्त समितीही स्थापन केली. पुढील काळात ही समिती एकमताने सर्व निर्णय घेईल, असे निश्चित करण्यात आले. तासभर झालेल्या या दोन्ही बैठकांनंतर मंत्री शिरसाट आणि जंजाळ यांच्यात समेट घडल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या उमेदवारींबाबतही चर्चा झाली. यात निवडून येण्याची क्षमता विचारात घेऊनच उमेदवारी देण्यात यावी. पक्षातील लोकांनाच प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिल्याचे समजते.