

The leopard that fell into the well has been captured
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर तालुक्यात शुक्रवारी दुपारी बिबट्याचे दर्शन घडले. पण हा बिबट्या विहिरीत आढळून आला. वैजापूर तालुक्यातील चांदगाव परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुरक्षित सुटका करण्यात आली. बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच वनविभागाने नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून बिबट्याचे प्राण वाचविले ही घटना १९ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दाणे वस्ती येथील रहिवासी गणेश मलिक यांच्या शेत गट क्रमांक ४७४ मधील विहिरीत सकाळी शेतपंप सुरू करण्यासाठी गेले. यादरम्यान विहिरीत बिबट्या पडल्याचे मलिक यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत लगेचच जरबद परिसरातील शेतकरी अरविंद दाणे, श्रीराम दाणे ताराचंद दाणे, सतीश अंभोरे, दत्तू दाणे, अजय मलिक, सागर अंबोरे, भगवान दाणे, सागर राजपूत, कचरू वाणी, दत्ता गायकवाड यांना याबाबत माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांनी दोरी बांधून विहिरीत बाज सोडली.
बिबट्या काही वेळ या बाजेवर विसावला. थोड्या वेळात याठिकाणी वनविभागाचे कर्मचारी पाचारण करण्यात आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन पार पाडत विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला पाण्याबाहेर काढून जेरबंद केले.