

The initiative of Thackeray Sena corporators to help the drought victims!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असताना त्यांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महापालिकेतील नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. ठाकरे गटाच्या सर्व नगरसेवकांचे ऑक्टोबर महिन्याचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री दुष्काळ निवारण निधीत जमा करावे, अशी मागणी नगरसेवकांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील अनेक भागांत अपुऱ्या पावसामुळे शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य नागरिकांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, ऑक्टोबर महिन्याचे मानधन नगरसेवकांच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये जमा न करता ते थेट मुख्यमंत्री दुष्काळ निवारण निधीत वर्ग करावे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. यासाठी महापालिकेच्या लेखा विभागामार्फत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याची विनंतीही आयुक्तांना करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मानधनातून मदत करून संकटग्रस्तांना आधार देणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे नगरसेवकांनी म्हटले आहे. या निवेदनावर गट नेते गणेश लोखंडे, नगरसेवक सचिन खैरे, हनुमान शिंदे, अब्दुल रशीद मामू, सावित्री वाणी, सुनीता सोनवणे आणि वैशाली कोरडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.