

The future of the Mahayuti depends on the role of BJP
मोबीन खान
वैजापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः महायुती एकत्रित लढणार असल्याचे आज जरी चित्र दिसत असले तरी वैजापुरातील राजकीय परिस्थिती मात्र वेगळी आहे. महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपकडून स्वबळाच्या सातत्याने हालचाली दिसत आहे. या निवडणुकीत भाजपची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
या पार्श्वभूमीवर महायुती टिकणार का, याकडे महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे. या घडामोडीवरच वैजापुरातील पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत. तालुक्यात नगरपालिका निवडणुकीनिमित्त मोठा राजकीय गुंता निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सध्या वैजापुरात महायुती विरुध्द महाविकास आघाडी असेच चित्र पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्या टप्प्यात दिसत आहे. पुढील काळात महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत चुरस पाहावयास मिळण्याची शक्यता आहे.
विशेषतः राज्यपातळीवरील निर्णयानुसार वैजापुरात महायुती साकारणार काय, याकडे विशेष लक्ष असणार आहे; पण एकूणच राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यास महायुती बलाढ्य दिसत असली तरी ती निवडणुकीत एकत्र दिसणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर विविध पक्षांतील अनेक दिग्गज व नव्या चेहऱ्यांनी मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश मिळवला. त्यामुळे भाजप स्वबळ आजमावणार की, महायुतीचा धर्म पाळणार, हे पुढील काळात पाहावे लागणार आहे. पुढील काळात महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे महायुती टिकली तर जागा वाटपाचा गुंता सोडविताना पक्षीय पातळीवर मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यपातळीवर निर्णयानंतर स्थानिक पातळीवरील घटामोडींना वेग येणार आहे. स्थानिक प्रमुख नेते यासाठी मोर्चेबंधणी करण्यात व्यस्त असले तरी इच्छुकांचे निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
वैजापुरात महायुतीच्या तुलनेने महाविकास आघाडीची ताकद कमी आहे. त्यामुळे महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून नव्या राजकीय खेळीचा प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे. सध्या भाजपकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक असणार आहे, तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. महायुती झाल्यास जागा वाटपाचा मोठा गुंता निर्माण होऊ शकतो. त्यामुळे युती झाल्यास जागा वाटपाचा फॉर्म्युला महत्त्वाचा ठरणार आहे. त्यावरच इच्छुकांच्या पुढील दिशा स्पष्ट होतील. येत्या काही दिवसांत राजकीय पातळीवर घडामोडींना वेग येणार असल्याने कार्यकर्त्यांत देखील उत्साह वाढला आहे.