

Structural audit to be conducted on all BOT projects
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
सिद्धार्थ उद्यानाच्या बीओटी प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या भव्य प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा काही भाग अगदी दोन वर्षांतच कोसळला. या दुर्घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे प्रकल्पाच्या बांधकाम दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यात २० वर्षे उलटूनही अनेक प्रकल्पांचे बांधकाम अजूनही अर्धवट स्वरूपातच आहेत. त्यामुळे महापालिका आता या सर्वच बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनपाचे उत्पन्न वाढवण्यासाठी २००६ मध्ये शहरात दहा ठिकाणी बोओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स व इतर प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेत कामांचा शुभारंभ करण्यात आला. यात सर्वप्रथम रेल्वेस्टेशन येथील शॉपिंग कॉम्प् लेक्स व त्यानंतर शहानुरबाडी येथील श्रीहरी पव्हेलियन आणि पीर बाजार, सिद्धार्थ उद्यान शॉपिंग कॉम्प्लेक्स व प्ले पार्क, वेदांतनगर स्विमिंगपूल व स्पोर्ट कॉम्प्लेक्स यासह इतर कामांचा यात समावेश आहे.
महापालिकेने या कामासाठी मोक्याच्या जागा विकासकांच्या घशामध्ये घातल्या. मात्र २० वर्षांत यातील सहा प्रकल्पच पूर्ण करण्यात विकासकांना यश आले आहे, तर काही प्रकल्पांचे काम अजूनही सुरूच आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने महापालिकेचे कोट्यवधींचे उत्पन्न पाण्यात गेले आहे.
या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यात सिद्धार्थ उद्यानाच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सलगतच्या भव्य प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळून दुर्घटना होऊन दोन महिलांचा मृत्यू झाल्याने प्रकल्पांच्या बांधकामाच्या स्ट्रक्चरवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
१ औरंगपुरा भाजीमंडई - प्रकल्पाचे बांधकाम सुरूच
२ ज्योतीनगर जलतरण तलाव - काम पूर्ण
३ शहागंज भाजीमंडई जागेच्या वादामुळे प्रकल्प रद्द
४ रेल्वेस्टेशन व्यापारी संकुल काम पूर्ण, उत्पन्न सुरू
५ शहानुरवाडी श्रीहरी पव्हेलियन काम पूर्ण
६ सिद्धार्थ उद्यान शॉपिंग कॉम्प्लेक्स व प्ले पार्क - कॉम्प्लेक्स पूर्ण, प्ले पार्क अपूर्ण
७ कॅनॉट प्लेस येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्स काम पूर्ण
८ वसंत भुवन शॉपिंग मॉल काम सुरूच
९ पडेगाव येथील कत्तलखाना कामाचा पहिला टप्पा पूर्ण, दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू
१० वेदांतनगर जलतरण तलाव व जीम काम सुरूच