

The first school bell will ring today after the summer vacations.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्यांनंतर सोमवारपासून राज्य मंडळाच्या शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे. जिल्हा परिषद आणि महापालिकेच्यावतीने शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शंभर शाळांवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. उन्हाळी सुट्यांनंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळा मागील आठवड्यात सुरू झाल्या. आता १६ जूनपासून राज्य मंडळाच्या शाळा सुरू होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवासह विविध उपक्रम राबविण्याची तयारी केली आहे. गावागावांत बालकांची बैलगाडी, घोडागाडी, उंट यावरून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत, मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण आदीचे नियोजन केले आहे. यासोबतच पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील शंभर शाळांमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देऊन प्रवेशोत्सवात सहभागी होणार आहेत. यामध्ये महसूल, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
जिल्ह्यातील शिक्षण विभागातील विविध अधिकारी प्रत्येकी दोन शाळा दत्तक घेणार आहेत. यामध्ये शिक्षणाधिकारी यांच्यापासून उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी अशा प्रत्येकाकडे दोन शाळा दत्तक म्हणून असतील. शाळांमधील गुणवत्तावाढीसह पटसंख्या वाढ, भौतिक सुविधा वाढविण्यासाठी हे अधिकारी पाठपुरावा करतील, संपूर्ण शैक्षणिक वर्षभर शाळांना भेटी देत, शाळांचा दर्जावाढीसाठी प्रयत्न करतील. जिल्ह्यात ३५ अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी दोन शाळा आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. त्यासाठी पाठ्यपुस्तक भांडारच्या विभागीय केंद्राकडून पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील ४९१ शाळांमधील सुमारे १ लाख २८ हजार विद्याथ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.
यंदा इयत्ता पहिलीच्या विद्याथ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळांसाठी ७८८११४ आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील शाळांसाठी १७९३७२० पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे.
शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश दिले जातात. जिल्ह्यात १ लाख ९९ हजार विद्याध्यर्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे. त्यापैकी प्रत्येकी एका गणवेशाचा निधी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी शालेय व्यवस्थापन समित्यांना उपलब्ध करून दिला आहे. काही शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटपाचेही नियोजन करण्यात आले आहे.