

Chhatrapati Sambhajinagar Food supply tribal students Misappropriation of government funds
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी बनावट दस्तऐ वजांच्या आधारे आदिवासी विद्यार्थ्यांच्या भोजन पुरवठ्याच्या नावाखाली सुमारे २५ लाख रुपयांचा शासकीय निधीचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विद्यार्थ्यांच्या जेवणावर डल्ला मारणाऱ्या सहा अधिकाऱ्यांविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिलीप नारायण खोकले, गृहपाल उत्तम नागोजी राऊत, सुरेंद्र अंबादास कावरे, शाम बबनराव देशमुख, बळीराम भीवाजी गडमे अशी आरोपींची नावे आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून झालेल्या चौकशीत हा प्रकार उघड झाला. २०१६ ते २०२० या कालावधीत बनावट हजेरीपत्रक, खोटे प्रतिज्ञापत्रे व इतर कागदपत्रांचा वापर करून भोजन देयके तयार करण्यात आली होती.
प्रत्यक्षात भोजन न पुरवता निधी उचलण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. तक्रारीसंदर्भात पोलिसांनी आदिवासी विकास आयुक्तालयाकडे वारंवार पत्रव्यवहार केला होता. मात्र अधिकृत तक्रारदार नियुक्त न झाल्याने गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला. अखेर सरकारतर्फे पुंडलिकनगरचे निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे यांनी तक्रार दाखल केली. या दोषी अधिकाऱ्यांविरोधात फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि विश्वासघाताचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.