

वैजापूर : तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील खंडाळा येथे युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, मध्यरात्री पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने खून केला. ही खळबळजनक घटना तालुक्यातील राहेगाव येथे १५ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. अनिता चांगदेव शेलार (५५, राहेगाव ता.वैजापूर) असे घटनेतील मृत महिलेचे नाव असून चांगदेव रामराव शेलार (५७, राहेगाव) असे मारेकरी पतीचे नाव आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील मृत अनिता शेलार या अंगणवाडी सेविका होत्या तर त्यांचा पती चांगदेव शेलार हा पोस्टमन आहे. त्यांना दोन मुली व एक मुलगा असून दोन्ही मुलींचे व मुलाचे देखील लग्न झालेले आहे. १४ जून रोजी सायंकाळी अनिता यांचा पती चांगदेव शेलार हा पंढरपूरहून घरी परतला होता. या दिवशी त्यांचा मुलगा घरी नव्हता तर त्यांची सून देखील माहेरहून सासरी परत आली. दरम्यान मध्यरात्री चांगदेव शेलार याने धारदार शस्त्राने अनिता यांच्या चेहऱ्यावर व मानेवर कोयत्याने सपासप वार केले. ही घटना समजताच नातलगांनी अनिता यांना रक्तबंबाळ अवस्थेत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान घटना घडताच चांगदेव याने विहिरीत उडी घेण्याचा प्रयत्न केल्याची परिसरात चर्चा होती. यानंतर चांगदेव याने घटनास्थळाहुन धूम ठोकली. रविवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलीस हवालदार योगेश झाल्टे, सीमा जाधव इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
पत्नी अनिता हिचा खून करून चांगदेव शेलार याने देखील विहिरीत उडी घेण्यात प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र यानंतर त्याने घटनास्थळाहुन धूम ठोकली. अनिता यांचा खून त्यांच्या पतीनेच केल्याचे पोलिसांना सकृतदर्शनी दिसून येत होते. पोलिस पथकाने चांगदेव याला रविवारी दुपारी साडे तीन वाजता तालुक्यातील शिऊर येथील बसस्थानकावरून ताब्यात घेतले. त्यांने पोलीसांना खुनाची कबुली दिली. मात्र खून का व कशासाठी केला ? याबाबत त्याने कुठलेही कारण पोलीसांना सांगितले नाही. पोलीस खुनाचा आणखीनही सर्व बाजूने तपास करित आहेत.
वैजापूर उपविभागात वैजापूर, वीरगाव, शिऊर हे तीन पोलिस ठाणे येतात या तिन्हीही ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्थेच्या आगदी तीन तेरा वाजले आहे. तसेच अवैध धंदे अगदी खुलेआम सुरू आहे, त्यामुळे वैजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून सिंघम अधिकारी हवा अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळत आहे.