

The female birth rate has increased in Gangapur; the situation is alarming in the district.
रमाकांत बन्सोड
गंगापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जन्मतः व मृत्यू समयी लिंग प्रमाणाबाबत चिंताजनक आकडेवारी समोर येत असताना गंगापूर तालुक्यात मात्र मुलींच्या जन्मदरात समाधानकारक वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरी नोंदणी पद्धतीनुसार एक वर्षाच्या आत नोंदणीकृत जन्मांमध्ये जिल्ह्याचे लिंग प्रमाण १००० पुरुषांमागे ८८७ स्त्रिया असे असून, पुरुष जन्म ५३ टक्के तर स्त्री जन्म ४७ टक्के आहेत.
जिल्ह्यात गंगापूर (९७४), कन्नड (९५१), खुलताबाद (९१३), फुलंब्री (९३२) आणि सोयगाव (९२१) हे तालुके वगळता इतर तालुक्यांमधील जन्मतः लिंग प्रमाण चिंताजनक पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः गंगापूर तालुक्याने ९७४ असे लिंग प्रमाण साध्य केल्यामुळे जिल्ह्यात तो सकारात्मक उदाहरण ठरत आहे.
दरम्यान, मृत्यू नोंदणीबाबतही असमतोल दिसून येत आहे. जिल्ह्यात अंतर्गत मृत्यू नोंदणीमध्ये दर हजार पुरुषांमागे केवळ सुमारे ५३७ स्त्रियांच्या मृत्यूची नोंद होत आहे. हे प्रमाण अपेक्षित नैसर्गिक लिंग गुणोत्तरापेक्षा कमी असून, स्त्रियांच्या मृत्यूंची नोंद कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. यामागे पितृसत्ताक सामाजिक रचना, स्त्रियांच्या मृत्यू नोंदणीसाठी कायदेशीर किंवा आर्थिक प्रोत्साहनांचा अभाव, तसेच जागरूकतेचा अभाव कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मृत्यू नोंदणी केल्यास विमा, पेन्शन, अनुदान यांसारखे लाभमिळतात, याबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे. सरकारी यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांनी माध्यमे, शाळा आणि समुदाय कार्यक्रमांच्या माध्यमातून विशेषतः स्त्रियांच्या मृत्यू नोंदणीवर भर देणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात येत आहे.
आरोग्य धोरणांसाठी अचूक आकडेवारी
महाराष्ट्र शासनाच्या १६ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार व १ डिसेंबर २०२५ च्या परिपत्रकानुसार, एक वर्षापेक्षा अधिक विलंबाने झालेल्या अवैध नोंदणींची पडताळणी करून त्या रद्द करण्याची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या पोर्टलवरील अचूक आकडेवारी लोकसंख्या नियोजन व आरोग्य धोरणांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने १०० टक्के जन्म-मृत्यू नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.