

A minor boy left home for a new mobile phone
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन मोबाईल घेऊन देण्यास आईने नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका १५ वर्षीय मुलाने घर सोडले. ही घटना १० डिसेंबर रोजी हर्सल परिसरात घडली. तो अद्याप घरी न परतल्याने त्याच्या आईच्या तक्रारीवरून मुलगा संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची नोंद हसूल पोलिसांनी घेतली आहे.
मोरया पार्क परिसरात राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्यांच्या १५ वर्षीय मुलाने १० डिसेंबर रोजी सकाळी नवीन मोबाइलची मागणी केली होती. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे मोबाईल घेणे शक्य नसल्याने त्यांनी नकार दिला. यानंतर त्या दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास कामावर गेल्या.
कामावर जाताना मुलाला घरीच थांबण्याची सूचनाही केली. सायंकाळी कामावरून त्या घरी आल्या असता मुलगा घरी नसल्याचे आढळून आले. त्यांनी मुलाचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी हसूल पोलिस ठाणे गाठून अज्ञात इसमाने आपल्या मुलाचे अपहरण केले असावे असा संशय व्यक्त केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक केदार करीत आहेत.