

The dream of high-tech Anganwadis has been short-circuited!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: अंगणवाड्यांना हायटेकचे चकचकीत स्वप्न दाखवणाऱ्या शासनाचा फुगा आता फुटू लागला आहे. आदर्श अंगणवाडी केंद्रांचा गवगवा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल सव्वातीन हजार अंगणवाड्या आजही विजेअभावी अंधारात आहेत. वीज बिलासाठी स्वतंत्र तरतूद नसल्याने विजेचे बिल भरायचे तरी कोण? हा सरळ प्रश्न अंगणवाडी सेविकांसमोर उभा ठाकला असून, संपूर्ण हायटेक अंगणवाडी संकल्पना कागदावरच राहिली आहे.
राज्य शासनाने अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किटला मंजुरी दिली. डिजिटल शिक्षण साधने, स्मार्ट टीव्ही, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, आरओ प्युरिफायर यासारखी साधने देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र या सर्व सुविधांचा वापर करण्यासाठी लागणारी मूलभूत गरज वीजच नसल्याने ही साधने अनेक ठिकाणी कोपऱ्यात धुळ खात पडली आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेली साधने प्रत्यक्षात उपयोगातच येत नाहीत, ही परिस्थिती चिंताजनक आहे.
सौर पॅनलची घोषणा अन् विस्मरण !
जिल्ह्यात एकूण ३,४२३ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी २,६५१ केंद्रांना स्वतंत्र इमारती आहेत. तरन्ही केवळ १७१ अंगणवाड्यांनाच वीजजोडणी उपलब्ध आहे. शासनाकडून वीज बिलासाठी तरतूद नसल्याने उर्वरित ३ हजारांहून अधिक केंद्रे पूर्ण अंधारात आहेत. गेल्या वर्षी अंगणवाड्यांना सौर पॅनल देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र वर्ष उलटून गेले तरी या घोषणेवर आजतागायत कोणतीही कारवाई नाही. परिणामी मुलांच्या शैक्षणिक आणि आरोग्यविषयक विकासासाठी असलेली साधने फक्त दाखवायची वस्तू बनली आहेत