

A road worth 50 lakhs, but no pipe worth 5,000.
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा :
शहरामधील ग्रामीण रुग्णालय ते म्हैसमाळ रस्त्यासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात आला. ७०० मीटर लांबीच्या रस्त्याच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नगर विकास विभागाकडून निधी मिळाल्यानंतर रस्त्याचे काम झपाट्याने पूर्ण झाले असले तरी फक्त ५ हजार रुपये खर्च येणाऱ्या सिमेंट पाईपची तरतूद न केल्यामुळे नागरिकांत संतापाची भावना निर्माण झाली आहे.
ग्रामीण रुग्णालय ते म्हैसमाळ या मुख्य रस्त्यापर्यंत नवीन डांबरीकरण रस्ता झाल्यानंतरही जुन्याच पाईपचा वापर करण्यात आल्याचे समोर आले. शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी स्वच्छ करणे अथवा अशुद्ध पाणी बाहेर काढण्यासाठी या पाईपचा वापर होतो. मात्र हे पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. रोजच पाणी अशा पध्दतीने रस्त्यावर येत असल्याने नवीन रस्ता लवकर खराब होण्याची शक्यता आहे.
हे पाणी जाण्यासाठी जुन्या रस्त्याच्या मध्ये एक जुना पाईप टाकण्यात आलेला आहे, पण सदरील काम करताना नवीन पाईप टाकणे आवश्यक होते. या रस्त्यावर सतत खराब पाणी वाहत असल्याने रस्ता लवकरच फुटण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत विचारणा केली असता पाणी जाण्यासाठी पाईप टाकण्याची तरतूद नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्याच्या कडेला भरती करण्याचे कामसुद्धा केलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.