

Case registered against in-laws for causing the death of a married woman.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घराचा वरचा मजला बांधण्यासाठी माहेराहून १० लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत सासरच्यांनी सुरू केलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने सोमवारी (दि.८) आत्महत्या केली. ही घटना एन-१३, वानखेडेनगरात घडली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विलास दिगंबर जाधव, सासू लता दिगंबर जाधव, भाया कैलास दिगंबर जाधव, जाऊ रूपाली कैलास जाधव (सर्व रा. एन-१३, वानखेडेनगर) यांच्याविरोधात बेगमुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणात अंबड चौफुली जालना येथील सुमन खंडोजी खरात (६४) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी सुमन यांची मुलगी पीडित शीतल विलास जाधव (३९, रा. एन १३ वानखेडेनगर, संभाजीनगर) हिचे विलास जाधव याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक दिली. त्यानंतर मात्र पतीसह सासरच्यांनी घराचा वरचा मजला बांधण्यासाठी माहेराहून १० लाख रुपये आण, असा तगादा लावला.
पैशाची सतत मागणी करत शीतलचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादीकडून पैशांची पूर्तता न होताच चौघांनी संगनमताने शीतलला शिवीगाळ आणि मारहाण केली. या नेहमीच्या छळाला कंटाळून शीतलने ८ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सिद्दीकी करीत आहेत.