The distribution of grain in the ration shops in the taluka was stopped
कन्नड, पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांतील ई-पॉस मशीन सुरळीत चालत नसल्यामुळे लाभार्थीना धान्य मिळणे अवघड होऊन बसले आहे.
येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाअंतर्गत पैठण शहर व तालुक्यातील २२० स्वस्त धान्य दुकान अंतर्गत लाभार्थीना महिन्याच्या दहा तारखेच्या आत धान्य वाटप करण्याचा आदेश आहे. गेल्या आठवड्यापासून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानावरील ई-पॉस मशीन सातत्याने बंद पडत असल्याने नागरिकांना धान्य वितरण झाले नसल्याचे समोर आले आहे. प्रत्येक दुकानदार धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांना आल्या पावलाने माघारी पाठवीत असल्याच्या तक्रारी आहेत. मशीनची सेवा सुरळीत झाल्यावर धान्य वाटप करण्याचे धोरण घेतल्यामुळे धान्य लाभार्थीना अधिक भावाने धान्य खरेदीची वेळ आली आहे.
विविध गावांतील स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थीना मिळणारे धान्य सुरळीत वाटप होते का नाही यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त यांनी धान्य वाटप प्रणाली सुरळीत करावी, अशी मागणी लाभार्थीमधून होत आहे.
पैठण तालुका पुरवठा विभागांतर्गत या योजनेवर देखरेख करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कमी असल्याचे सांगण्यात येते. गेल्या आठवड्यापासून लाभार्थीना धान्य वाटप झालेले नाही, या संदर्भात तालुका पुरवठा अधिकारी कैलास बहुरे यांनी ई-पॉस मशीन संदर्भात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे सांगितले. लवकरच धान्य वाटप व्यवस्था सुरळीत होईल, असे ते म्हणाले.
पुरवठा विभागाकडून पैठण शहरासह तालुक्यातील २२० स्वस्त धान्य दुकानदारांनी मात्र मुदतीच्या आत लग्नघाई करून गोडाऊन मधून धान्य उचलून घेतले आहे. हे धान्य लाभाथ्यर्थ्यांपर्यंत पोहचले नसल्याच्या तक्रारी आहेत. रेशन दुकानदार ई- पॉस मशीनचे कारण सांगत असल्याने लाभार्थ्यांना दुकानात चकरा मारण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सदरील धान्य दुकानात पडून असल्याने निकृष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढावा व धान्य मिळावे अशी मागणी लाभार्थी करत आहेत.