

Ladki Bhahin scheme a failure in the state: Asaduddin Owaisi
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : राज्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत, रोजगाराचा प्रश्न आहे, लाडक्या बहीण योजनेचा बोजवारा उडाला आहे. यापासून सर्वसामान्यांचे दुर्लक्ष करण्यासाठी मराठी- अमराठी असे विषय समोर आणले जातात, असा आरोप एमआयएमचे प्रमुख असोवेद्दीन ओवेसी यांनी केला.
नांदेडच्या न्यायालयात सुनावणीसाठी मंगळवारी रात्री उशिरा आपल्या समर्थकांसह नांदेडात दाखल झाले. सकाळी ११ वाजता न्यायालयात हजेरी लावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. भाजपच्या नितेश राणे यांनी मुस्लिमांनी नमाज मराठीत अदा करावी, असे आवाहन केले होते.
त्यावर बोलताना ओवेसी यांनी राणे व त्यांच्या परिवारांनी केलेल्या जुन्या ट्विटची आठवण केली. महाराष्ट्रात महार शेतकरी आत्महत्या करीत आहेत, बेरोजगारांच्या हाताला काम नाही, लाडकी बहीण योजनाही यशस्वी ठरली नाही. या सर्व सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून विनाकारण मराठी-अमराठी असा वाद निर्माण केला जात आहे.
पहलगामच्या घटनेबाबत जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली असल्याचे मान्य केले. याकडे लक्ष वेधले असता ओवेसी यांनी राज्यपालांनी राजीनामा देण्याची मागणी केली. २६ भारतीयांची हत्या करण्यात आली. धर्म विचारून झालेल्या या घटनेबाबत सुरक्षाव्यवस्थेत चूक झाली आणि ती मान्य केली असेल तर राज्यपालांनी राजीनामा द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.