

The difficult Garmatha mountain pass was crossed by the Warkaris
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : नाथांच्या पवित्र पादुकांसह नाथांच्या सोहळ्याचे मानकरी यांना बैलाविनागाडीत बसून अवघड गारमाथा डोंगर घाट हजारो वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार करण्याचा सोहळा मंगळवारी (दि. २४) दुपारी मोठ्या उत्साहात झाला.
मुक्काम दर मुक्काम करीत पंढरीच्या दिशेने निघालेल्या शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी मंगळवारी हटकरवाडी येथील परंपरा कायम ठेवली.
मंगळवारी सकाळी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी रायमोह पंचक्रोशीत मुक्काम पूर्ण करून सकाळी साडेपाच वाजता सोहळा गावातील भक्तांनी वाजत गाजत मार्गस्थ केला. नाथाचा सोहळा कैदकेवस्ती, हाटकरवाडी येथे दाखल होताच परिसरातील भाविकांनी वारक यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
परंपरेनुसार या भागातील तरुण नाथ भक्तांनी एक दिवस उपास ठेवून. नाथांच्या पवित्र पादुकांसह सोहळ्याचे मानकरी नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांना मानाचा विना बैलाच्या गाडीत बसवून गारमाथा अवघड डोंगर घाट भानुदास एकनाथ जयघोष करून पार केला. हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी पहाटेपासूनच परिसरातील वारकऱ्यांसह राज्याच्या विविध भागातील नाथ भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. नाथांच्या पवित्र पादुका भाविकांच्या दर्शनासाठी गारमाथा चौकात ठेवण्यात आल्यामुळे या डोंगरावर जत्राच भरली होती.
पाटोदा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांच्यासह आप्पासाहेब राजपुरे, दासोपंत लावंडे, आबा सुस्ते, रामा शिंदे, बापू राजपुरे, राजेंद्र शिंदे, दादाहरी सदगर, शांतीलाल सदगर, माधाहारी सदगर यांनी नाथांच्या पादुका पूजन केले. पाटोदा महसूल विभागाच्या वतीने गारमाथा डोंगर परिसरात वारकऱ्यांना चहा बिस्कीट वाटप केले.
दुपारी मोठ्या उत्साहात गारमाथा डोंगरावरून सोहळा मार्गस्थ होऊन सातव्या मुक्कामासाठी महेंदवाडी, उंबरविहीर, तांबा राजुरीमार्गे पाटोदानगरीत आगमन होताच पाटोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नाथाच्या पालखी सोहळ्याचे लेझीम ढोल-ताशांत फटाक्यांची आतषबाजी करून नगराध्यक्ष राजेंद्र जाधव, तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांच्यासह विविध मान्यवर स्वागत केले.
श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे दुसरे रिंगण घुमरे पारगाव (ता. पाटोदा) या पंचक्रोशीत बुधवारी (दि.२५) दुपारी संपन्न होणार असून, या रिंगण सोहळ्यासाठी घुमरे पारगाव येथील भाविकांनी जोरदार तयारी केली आहे.