Sambhajinagar News : जि. प. नवीन प्रशासकीय इमारतीचे काम रामभरोसे

सभापती सचिन गरड यांनी कंत्राटदारासह अधिकाऱ्यांना धरले धारेवर
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जि. प. नवीन प्रशासकीय इमारतीचे काम रामभरोसेfile photo
Published on
Updated on

The construction of the new administrative building of the Zilla Parishad has not been completed yet despite being extended three times.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम तब्बल तीन वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप पूर्ण झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष काम अपूर्ण असतानाच कंत्राटदाराला मंजूर ५९ कोटी रुपयांपैकी तब्बल ५७ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याने या प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला पाठीशी घातल्यामुळेच काम रखडल्याचा आणि कामाच्या दर्जाकडेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड यांनी केला आहे. त्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करत संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराची कानउघाडणी केली.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : ठराविक कंत्राटदारांनाच बहुतांश कामे

या इमारतीच्या बांधकामासाठी ३ सप्टेंबर २०२१ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. मूळ नियोजनानुसार हे ३० महिन्यांत म्हणजेच ३ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. सुरुवातीला या प्रकल्पासाठी ४७ कोटी ३३ लाख २४ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, नंतर सुधारित प्रशासकीय मान्यता देत खर्च ५९ कोटी ४१ लाख ८१ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आला.

मुदत संपल्यानंतरही काम पूर्ण न झाल्याने कंत्राटदाराला प्रथम जानेवारी २०२५ पर्यंत, त्यानंतर मार्च २०२६ पर्यंत आणि आता ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अशी सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुदतीत काम पूर्ण न करूनही कंत्राटदारावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. उलट अपूर्ण कामासाठीच कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Sambhajinagar News
Parbhani News : स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांची कोंडी

नवीन इमारतीचे काम रखडल्यामुळे जिल्हा परिषदेचे विविध विभाग शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी हेलपाटे मारावे लागत असून प्रशासकीय कामकाजावरही परिणाम होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही इमारतीचे काम अद्याप पूर्णत्वास न गेल्याने जनतेत नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्व विभाग वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कंत्राटदाराने काम मुदतीत पूर्ण केले नाही. अधिकाऱ्यांनी त्याला जावयासारखी वागणूक देत वारंवार मुदतवाढ दिली आणि अपूर्ण कामाचीही बिले अदा केली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कडक कारवाई करणार.
- सचिन गरड, सभापती, अर्थ व बांधकाम
वारंवार कामाच्या स्वरूपात बदल करण्यात आल्यामुळे कामाला उशीर झाला आहे. प्रत्यक्षात कामे तपासूनच बिले देण्यात आली आहेत. निधी व विजेबाबत प्रशासनाकडूनही विलंब झाला आहे. निधीची मागणी केली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.
- वासुदेव साळुंके, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी
इलेक्ट्रिसिटी नसल्याने काम रखडले आहे. मागील दीड वर्षांपासून मी विजेसाठी पाठपुरावा करत आहे. काम न करताच बिल दिले असे वाटत असेल तर सभापतींनी अधिकाऱ्यांची चौकशी करावी. ९५ टक्के काम पूर्ण झाले असून काही कामे अधिकाऱ्यांनीच करण्यास मनाई केली होती. वीज मिळाल्यास पुढील तीन महिन्यांत काम पूर्ण करेन.
-एन. के. खान, कंत्राटदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news