Water Supply Disrupted : अभ्यंगस्नानाच्या आदल्या दिवशीच शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

ढोरकीनजवळ फुटली नऊशेची जलवाहिनी : पुरवठा सुरळीत ठेवण्याचे मनपाकडून प्रयत्न
 Water Supply
Water Supply Disrupted : अभ्यंगस्नानाच्या आदल्या दिवशीच शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत File Photo
Published on
Updated on

The city's water supply was disrupted the day before the Diwali

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अभ्यंगस्नानाच्या आदल्या दिवशी शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. ढोरकीनजवळ ९००ची जलवाहिनी फुटली असून, फारोळ्याजवळील स्टील कंपनीसमोर शनिवारी (दि.१८) फुटलेल्या सातशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीची रविवारी (दि.१९) पहाटे दुरुस्ती करण्यात आली. सकाळी त्यातून पाणीपुरवठा सुरू झाला. या जलवाहिनीची दुरुस्ती होताच ढोरकीनजवळ नऊशेची जलवाहिनी फुटली. त्यामुळे अभ्यंगस्नानाच्या आदल्या दिवशी शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाल्याने दिवाळी सणाच्या उंबरठ्यावर शहरवासीयांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा फटका बसला आहे. काही भागांत अभ्यंगस्नानासाठी नागरिकांकडून पाण्याची व्यवस्था करण्याची लगबग दिसून आली. मात्र दिवाळीला पाणी पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी मनपाकडून जलकुंभावर पथके तैनात करण्यात आली आहेत.

 Water Supply
खरेदीवार ! दिवाळीनिमित्त बाजारपेठेत तुफान गर्दी

शहराच्या पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटण्याचे सत्र सुरूच असून, फारोळ्याजवळ शनिवारी पहाटे सातशे मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर मनपा पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता एम. एम. बाविस्कर, कनिष्ठ अभियंता आशिष वाणी व सुभाष लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकांनी रात्रभर काम करून रविवारी पहाटे दुरुस्ती पूर्ण केली आणि सकाळी सातशेच्या जलवाहिनीमधून पुरवठा सुरू केला. मात्र ही लाईन सुरू होताच ढोरकीन पंप हाऊसजवळ नऊशे मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे नव्याने सुरू झालेला पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला. या लाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कळविण्यात आले, परंतु दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे या लाईनचा पुरवठा पूर्णपणे बंद करून सातशेच्या जलवाहिनीतून पर्यायी पुरवठ्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, दिवाळी सणाला सुरुवात झाली असून, आज अभ्यंगस्नान आहे. त्यातच शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. यावर मनपाकडून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

 Water Supply
Diwali Festival : दीपावलीचे तेजपर्व आजपासून

शहरात कमी दाबासह मर्यादित पुरवठा

सातशेच्या पंपांद्वारे काही भागांत कमी दाबाने पाणीप-रवठा करण्यात आला. मात्र सिडको, गारखेडा, बेगमपुरा, शाहगंज, जुना मोंढा, हडको, जळगाव रोड आदी भागांत रविवारी सकाळपासूनच पाण्याचा ठणठणाट होता. आज अभ्यंगस्नानाचा दिवस असून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास सणाच्या दिवशीच पाण्याविना राहावे लागेल, अशी चिंता नागरिकांतून व्यक्त होत आहे.

दिवाळीला पुरवठा सुरळीत राहील : मनपाचा दावा

शहरात दररोज १७१ एमएलडी पाणी मिळत असल्याने एकूण पुरवठा पूर्वीपेक्षा सुधारलेला असला तरी वारंवार होणाऱ्या जलवाहिनी फुटीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ढोरकीनजवळील नऊशे मिमी व्यासाच्या मुख्य लाईनमध्ये दाब वाढल्याने ती फुटली. सातशे मिमीची जलवाहिनी सुरू करण्यात आली असून, उद्या सकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरू होईल. तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जलकुंभावर पथक नेमण्यात आले असून, दोन पथके गस्तीवर असतील. अभ्यंगस्नानाच्या दिवशी पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, असे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news