

The bright festival of Diwali begins today
कोल्हापूर/छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अंध:कारावर विजय मिळवणारे, लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणारे, अभ्यंगस्नानाच्या सुगंधासह स्नेहभेटीचा ओलावा देणारे दिवाळीचे तेजपर्व सोमवारच्या पहाटेपासून सुरू होत आहे. वसुबारसने दिवाळीच्या सणाची नांदी झाली असली तरी नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीचा उत्साह अधिक प्रकाशमय होणार आहे. रांगोळ्या, पणत्या, आकाश दिव्यांच्या सजावटीने घरोघरीचे अंगण उजळले आहे.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा सण. मांगल्य आणि चैतन्याची अनुभूती. असत्यावर सत्याने मात केल्यानंतर होणारी आनंदाची उधळण. नावीन्याचा साज अनुभवण्याची पर्वणी. १५ दिवसांपासून दिवाळी सणाचे वेध शहरवासियांना लागले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी बाजारपेठांतील रस्ते फुलून गेले होते. घरोघरी फराळाचे पदार्थ करण्याची गृहिणींची लगबगही संपली असून विविध प्रकारच्या प्रकाशमय सजावटीने घर सजवण्यात सहकुटुंब रंगून गेले होते.
लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा, भाऊबीज अशा सणांनी दिवाळी साजरी करण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अनेक घरांमध्ये दिवाळीनिमित्ताने गोकुळ अवतरले आहे. नोकरी, शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने परगावी असलेली मुलं, सुना, नातवंडे दिवाळीसाठी घरी आले आहेत. त्यामुळे एरवी शांत असलेल्या घरांमध्ये चैतन्याचा फुलोरा फुलला आहे.
उद्या लक्ष्मीपूजन
मंगळवार, दि. २१ रोजी लक्ष्मीपूजन आहे. त्याचीही तयारी जोरात सुरू आहे. सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांपासून रात्री ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाची शुभवेळ आहे. यानिमित्ताने पूजा साहित्य, झेंडूची फुले, माळा, विड्याची पाने यांची बाजारपेठ फुलली आहे.